राजेंद्र पाटील यड्रावकर मंत्री, तर धैर्यशील माने खासदार

दयानंद लिपारे, लोकसत्ता

कोल्हापूर :  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहून राजकीय घुसमट आणि कोंडी वाटय़ाला येण्याचा प्रकार कोल्हापूर जिल्ह्य़ातील दोन बडय़ा राजकीय घराण्यांवर आला. मात्र, लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या राजकीय सारीपाटावर बदल घडल्याने या दोन्ही कुटुंबांचा भाग्योदय शिवसेनेमुळे झाला आहे. धैर्यशील माने या तरुण नेतृत्वाला खासदार होण्याची संधी शिवसेनेकडून मिळाली. तर, याच आठवडय़ात शिवसेनेला पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना शिवसेनेकडून राज्यमंत्रीपद मिळाले. पहिल्याच दमात आमदार होणाऱ्या या आमदारास एकाच वेळी तब्बल पाच खात्यांचा पदभार सोपवला आहे.  यामुळे या दोन्ही युवा नेत्यांनी शिवसेनेमुळे राजकीय पुनर्वसन झाल्याची भावना व्यक्त केली आहे.

कोल्हापूर जिल्ह्य़ात लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत अनेक फेरबदल झाले. दोन वेळा खासदार झालेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी उभय काँग्रेसबरोबर हातमिळवणी केली. त्यांच्याशी शेट्टी यांनी घेतलेली गळामिठी मतदारांना रुचली नाही. याच वेळी राष्ट्रवादीकडे पक्षाच्या माजी खासदार निवेदिता माने यांनी उमेदवारी मागितली होती. परंतु, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचा कल हा शेट्टी यांच्याकडे राहिला. त्यामुळे माने परिवारात मोठय़ा प्रमाणात नाराजी निर्माण झाली. त्यातून दिवंगत खासदार बाळासाहेब माने, निवेदिता माने त्यांचा राजकीय वारसा सांगणारे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने यांनी ‘मातोश्री’ची वाट धरली. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या हातावर शिवबंधन बांधून पुढे लोकसभेची उमेदवारी दिली. माने यांनी तब्बल लाखभर मतांनी विजय मिळवत शेट्टी यांची हॅटट्रिक चुकवली.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी शिरोळ मतदारसंघात उमेदवारी मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र पाटील यांचे गेले पाच वर्ष जोरदार प्रयत्न सुरू होते. येथेही शेट्टी यांनी महाआघाडीच्या माध्यमातून शिरोळ मतदारसंघ स्वाभिमानीकडे घेऊ न सावकार मादनाईक यांना उमेदवारी दिली. राजेंद्र पाटील यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवून तब्बल तीस हजाराच्या मताधिक्कय़ाने एकतर्फी विजय मिळवला. पाटील परिवाराने आजवर चार वेळा निवडणुका लढवून यश मिळवले नव्हते; ते राजेंद्र पाटील यांच्या रूपाने पहिल्यांदाच विजय मिळवून अपयशाची परंपरा धुवून टाकली. निवडून आल्यावर पाटील यांना नवी राजकीय फेरमांडणी करीत तातडीने शिवसेनेला पाठिंबा दिला. परिणामी, गेल्या मंत्रिमंडळ विस्तारात पाटील यांना सामावून घेतले. तीन दिवसांपूर्वी झालेल्या खाते वाटपात पाटील यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य या पाच महत्त्वाच्या खात्यांचा पदभार सोपवून त्यांच्या कर्तृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे.

शिवसेनेविषयी कृतज्ञता

याबाबत मंत्री राजेंद्र पाटील, धैर्यशील माने यांनी शिवसेना विषयी कृतज्ञता व्यक्त केली. मंत्री पाटील म्हणाले,‘शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी उपकाराची भावना आहे. त्यांच्या कृपेमुळे मंत्रीपद मिळाले आहे. शिवसेनेने केलेले हे सहकार्य आयुष्यात विसरता येणार नाही.’ खासदार माने म्हणाले,की माने घराण्यात माझ्या रूपाने तिसरे खासदार येण्याची किमया ही उद्धव ठाकरे यांच्यामुळे साध्य झाली आहे. ठाकरे यांच्यामुळे माने घराण्याला यशाचे तोरण बांधता आले. शिवसेनेने केलेले हे सहकार्य कदापिही विसरता येणार नाही.