काश्मीर प्रश्न, ३७० कलम, अयोध्या राम जन्मभूमी विषय, राम मंदिर निर्मिती, समान नागरी कायदा अशा अनेक प्रश्नांवर भाजप-शिवसेनेने एकत्रितपणे निवडणूक लढवली होती. निकाल हाती येताच टोकाची विरोधी भूमिका असणाऱ्या पक्षांसोबत शिवसेनेने सत्तेसाठी सोबत केली आहे. मतदारांशी केलेल्या विश्वासघाताचे उत्तर शिवसेनेला महाराष्ट्रातील तमाम जनतेला द्यावेच लागेल, असा घणाघाती प्रहार भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी रविवारी येथे केला.

सोमय्या हे आज कोल्हापूर शहरात एका लग्नकार्यासाठी आले होते. त्यातून भाजपा जिल्हा कार्यालयात त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी अल्पकाळ संवाद साधला.

स्वागत पं. म. देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव यांनी केले तर आभार विजय जाधव यांनी मानले. जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, अशोक देसाई यांनी सोमय्या यांचे स्वागत केले. या वेळी अ‍ॅड.संपत पवार, मारुती भागोजी, दिलीप मैत्राणी, नगरसेवक अजित ठाणेकर उपस्थित होते.

‘भाजपा कार्यकर्त्यांनी दक्ष राहावे’

बदलत्या राजकीय समीकरणात भाजपा कार्यकर्त्यांनी आगामी काळात दक्ष राहावे लागेल, असे नमूद करून सोमय्या म्हणाले, भ्रष्टाचारी पार्श्वभूमी असलेल्या दोन्ही काँग्रेस या निव्वळ सत्तेसाठीच एकत्र आलेल्या आहेत. या सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर लक्ष ठेवून जनतेच्या प्रत्येक पैशांचा योग्य वापर होण्यासाठी अंकुश रूपात भाजपालाच जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. ज्या मित्र पक्षासाठी मला स्वत:च्या उमेदवारीचा त्याग करावा लागला, त्याच मित्र पक्षाने संधी साधून दगा दिला आहे, अशा शब्दात शिवसेनेवर कोरडे ओढून त्यांनी अशा या एकत्रित झालेल्या सर्व विरोधी पक्षांचा धडा शिकवण्यासाठी मी नव्याने मैदानात उभा ठाकलो असल्याचे सांगितले.