करवीरनगरीला स्वच्छ प्रशासन देण्याचे प्रलोभन दाखविणाऱ्या भाजप-ताराराणी आघाडीचे उमेदवार हे मोक्का कायद्यातील गुन्हेगार, खुनातील आरोपी, गुंड प्रवृत्तीचे आणि अवैध व्यावसायिक असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत केला. भाजप-आघाडीचा जाहीरनामा जनतेची दिशाभूल करणारा पोकळ असल्याची टीका त्यांनी केली.
महापालिका निवडणुकीतील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी राऊत यांनी आज शहरात तळ ठोकला होता. प्रचाराला सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या टीकेचा सूर त्यांनी आळवला. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना स्वच्छ चारित्र्याचे प्रमाणपत्र देताना खासदार राऊत यांनी भाजप-ताराराणी आघाडीतील उमेदवारांच्या गुन्हेगारांची पाश्र्वभूमी विशद करून आघाडीच्या स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवारीचा पर्दाफाश केला. स्वाती पाटील यांचे वडील आर.डी.पाटील दारू व्यावसायिक, विलास वास्कर मोक्कांतर्गत आरोपी, हेमंत कांदेकर हद्दपार आरोपी असल्याकडे लक्ष वेधत राऊत यांनी सभ्यतेची भाषा करणाऱ्या भाजपाने आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला. आघाडीशी युती केली नसती तर भाजपाला ८१ प्रभागात उमेदवारही उभे करता आले नसते, अशी जाहीर कबुली देणाऱ्या पालकमंत्री पाटील यांनी दहशत माजवणाऱ्या धनिकांना सोबत घेऊन निवडणूक लढवण्याचा केविलवाणा प्रयत्न चालविला असल्याची टीका केली.
केंद्र व राज्यातील भाजपाच्या धोरणात सुस्पष्टता नसल्याचे नमूद करुन राऊत म्हणाले, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, अन्न सुरक्षा योजना, पेयजल योजना याबाबत शिवसेनेने मागणी करूनही त्याची योग्य दखल घेतली जात नाही. तरीही पालकमंत्री धांदात खोटे बोलून कोल्हापूरच्या विकासासाठी निधी मिळवण्याची खोटी घोषणा करीत आहेत. तथापि, शिवसेनेने महापालिका निवडणुकीत स्वाभिमानी बाणा जपत सामोरे जाण्याचे ठरवले असून पक्ष स्वबळावर सत्तेवर येईल, असा दावा त्यांनी केला. या वेळी संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पवार, शहरप्रमुख शिवाजी जाधव उपस्थित होते.
टोलमुक्तीवर पालकमंत्री लक्ष्य
भाजपाचा जाहीरनामा घोषित करताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर टोलमुक्त करण्याची घोषणा केली होती. यावरून शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी टोलचा प्रश्न हा रस्ते विकास महामंडळाचे मंत्री एकनाथ िशदे यांच्या अखत्यारित असताना चंद्रकांत पाटील यांना टोलमुक्ती करण्याचा अधिकार कोणी दिला, असे म्हणत टीका केली. कोल्हापूरला स्मार्ट सिटी करण्याची घोषणा करण्यापूर्वी कोल्हापूर शहर या योजनेत समाविष्ट होणेसाठी तरतुदींची पूर्तता करते का, हे पाहाण्यास पालकमंत्री विसरले असल्याचा टोला त्यांनी लगावला.