कोल्हापूर : महापुरापासून बचाव करून कोल्हापुरात प्रवेश करण्यासाठी असणाऱ्या बास्केट ब्रिज वरून आजी-माजी खासदारातील वाद गुरुवारी पुन्हा उफाळून आला आहे. माजी खासदार धनंजय महाडिक यांनी सादर केलेल्या बास्केट ब्रिजला निधी मंजूर नसल्याचा मुद्दा शिवसेनेकडून मांडण्यात आला.

कोल्हापूर शहराला महापुराचा धोका जवळपास दर वर्षी असतो. त्यामुळे पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गकडून कोल्हापुरात प्रवेश करणाऱ्या ठिकाणी १६० कोटी रुपये खर्चाचा बास्केट ब्रिज बांधण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर केला आहे.

महापुराच्या काळात हा पूल दळणवळणासाठी उपयुक्त ठरेल, असा दावा धनंजय महाडिक हे सातत्याने करत होते. नुकत्याच झालेल्या दौऱ्यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महाडिक यांच्या पुलाच्या संकल्पनेचे कौतुक करून तो मार्गी लावणे गरजेचे असल्याची मागणी ही केली होती.

तथापि या प्रकरणाचा शिवसेनेकडून पाठपुरावा करण्यात आला. आजच्या पत्रकार परिषदेत संजय पवार व विजय विजय देवणे या जिल्हा प्रमुखांनी बास्केट ब्रिजचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग मंडळ व राज्य रस्ते विकास मंडळ यांच्या कार्यालयाकडे सादर झाला नाही. त्यासाठी कोणताच निधी प्राप्त नसल्याचे पत्र सादर केले. शिवाय महाडिक यांनी जनतेच्या डोळ्यात धूळफेक केल्याचा आरोपही त्यांनी केला. कोल्हापुरात प्रवेश करण्यासाठी अशा स्वतंत्र प्रवेश पुलाची गरज असून त्यासाठी परिपूर्ण आराखडा सादर करणे गरजेचे आहे. अशी मागणी खासदार संजय मंडलिक यांनी केंद्र शासनाकडे केली असून ते पाठपुरावा करत असल्याचा दावाही त्यांनी केला.