तावडे हॉटेल परिसरातील अतिक्रमणावर कारवाई न केल्याचा निषेध

कोल्हापूर : तावडे हॉटेल परिसरातील महापालिकेच्या जागेवरील अतिक्रमणांवर कारवाई न केल्याच्या निषेधार्थ गुरुवारी शिवसेनेने महापालिकेवर मोर्चा काढत बांगड्या फेकल्या. महापालिका इमारतीभोवती बांगड्या फेकत प्रशासनाच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. यापुढे गरिबांची घरे पडण्याचा प्रयत्न झाल्यास महापालिकेच्या अतिक्रमण विभागास पळवून लावण्यात येईल, असा इशारा देण्यात आला .

येथील तावडे हॉटेल परिसरातील महापालिकेच्या हद्दीमध्ये असलेल्या आरक्षित जागेवरील अतिक्रमणे झाली आहेत. या अतिक्रमणांवर कारवाई करून जागा तातडीने महापालिकेने ताब्यात घ्यावी, असे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. या आरक्षित जागेवर काही धनदांडग्यांनी, पशाच्या जोरावर कायदा पायदळी तुडवून जाणीवपूर्वक अतिक्रमणे केली आहेत. त्यावर कारवाईचे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. तरीही महापालिकेच्या अधिकारयांनी कारवाई करण्याचे टाळून अकार्यक्षमताच सिद्ध केली आहे, असा आरोप करत आज शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले .

या मोर्चाची सुरवात पापाची तिकटी येथून झाली. हातगाडीवर बांगड्या ठेवून मनपा प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत शिवसनिकांची बांगड्या मनपा इमारतीवर भिरकावल्या. मुख्य दरवाजाजवळ आल्यानंतर बांगड्या मुख्य गेटला बांधण्यात आल्या. त्यामुळे सर्वसाधारण सभेसाठी आलेल्या सदस्यांना बाहेरच काही वेळ थांबावे लागले. महापालिकेने तातडीने तावडे हॉटेल परिसरातील अतिक्रमणे जमीनदोस्त करून कर्तव्याचे पालन करावे, अन्यथा भविष्यात कोणत्याही सर्वसामान्याच्या अतिक्रमणावर कारवाई केल्यास शिवसेना चोख उत्तर देईल, अशा इशारा निवेदनात दिला आहे.

आंदोलनात जिल्हाप्रमुख संजय पवार, उपजिल्हा प्रमुख सुजित चव्हाण, शहरप्रमुख शिवाजीराव जाधव, दुग्रेश लिंग्रस, शुभांगी पोवार, रिया पाटील, हर्षल सुर्वे, रवी चौगुले आदींसह शिवसैनिक सहभागी झाले होते.