काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मतांमध्ये घट, भाजपच्या मतांमध्ये फारसा फरक नाही

मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने २०१४च्या निवडणुकीत मिळवलेले यश कायम राखले असले तरी शिवसेनेच्या मतांच्या टक्केवारीत तीन टक्क्य़ांनी वाढ झाली आहे. भाजपच्या मतांमध्ये फार काही वाढ झालेली नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या एकत्रित मतांची टक्केवारी तीन टक्क्यांनी घटली आहे.

भाजपने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या आहेत. गेल्या वेळीही उभयतांचे संख्याबळ कायम होते. फक्त यंदा काही विजयी मतदारसंघ बदलले आहेत. भाजप आणि शिवसेनेच्या एकूण मतांमध्ये वाढ झाली आहे. भाजपला २०१४च्या निवडणुकीत राज्यात १ कोटी ३३ लाख मते मिळाली होती. यंदा दीड कोटींच्या आसपास मते मिळाली आहेत. शिवसेनेला गतवेळी १ कोटी मते होती. या वेळी शिवसेनेला १ कोटी २५ लाखांपेक्षा जास्त मते मिळाली आहेत. काँग्रेसला २०१४ मध्ये ८८ लाख ३० हजार एकूण मते होती. यंदा सुमारे ८८ लाख मते मिळाली आहेत. राष्ट्रवादीला ७७ लाख मते होती. यंदा सुमारे ८० लाख मते मिळाली आहेत.

भाजपबरोबर युती करण्याचा घेतलेला निर्णय शिवसेनेसाठी फायदेशीर ठरला आहे. कारण भाजपची साथ मिळाल्यानेच बहुधा शिवसेनेच्या मतांमध्ये वाढ झालेली दिसते. इतर कोणत्याही पक्षांपेक्षा शिवसेनेच्या मतांमध्ये सुमारे २५ लाखांनी वाढ झाली आहे. शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान व्हावे म्हणून भाजपच्या यंत्रणेने प्रयत्न केले होते. कारण राज्यातून जास्तीत जास्त जागा निवडून आल्या पाहिजेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांना बजावले होते. त्याचाही फायदा झाला आहे. शिवसेनेला सर्व थरांतून चांगला पठिंबा मिळाला. यातूनच पक्षाची मते वाढल्याचा दावा शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केला आहे.

भाजपच्या मतांच्या टक्केवारीत फार काही वाढ झालेली नाही. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार,गतवेळच्या तुलनेत भाजपच्या मतांच्या टक्केवारीत ०.३ टक्के वाढ झाली आहे. शिवसेनेच्या मतांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मतांमध्ये मात्र घट झाली आहे. केवळ एक जागा मिळालेल्या काँग्रेसच्या मतांमध्ये दोन टक्क्य़ांनी घट झाली आहे. राष्ट्रवादीची मते एक टक्क्य़ापेक्षा कमी प्रमाणात घटली आहेत.

भाजप आणि शिवसेनेच्या एकत्रित मतांची टक्केवारी ५० टक्क्य़ांपेक्षा जास्त होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची एकत्रित टक्केवारी ३१ आहे. गत वेळी युतीच्या मतांची टक्केवारी ४८ होती तर आघाडीला ३४ टक्के मते मिळाली होती. युतीचे संख्याबळ ४१ कायम असले तरी मतांची टक्केवारी तीनने वाढली आहे. याउलट काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मतांमध्ये तीन टक्के घट झाली आहे.

यंदा अन्य पक्षांना १४ टक्के मते मिळाली आहेत. यात बहुतांशी मते वंचित बहुजन आघाडीला मिळाली आहेत. गतवेळी या मतांचे प्रमाण ४ टक्क्यांच्या आसपास होते. वंचित बहुजन आघाडीने आठ मतदारसंघांमध्ये चांगली मते मिळविली आहेत.

साडेचार वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढले होते. तेव्हा भाजपला (२७.८१ टक्के), शिवसेना (१९.३५ टक्के), काँग्रेस (१७.९५ टक्के) तर राष्ट्रवादीला १७.२४ टक्के मते मिळाली होती. मतांच्या टक्केवारीवर नजर टाकल्यास गेल्या पाच वर्षांत प्रत्येक राजकीय पक्षाच्या मतांमध्ये फारसा फरक पडलेला नाही.

 

युती झाल्याचा फायदा भाजप आणि शिवसेनेलाही झाला आहे. राज्यात मोठय़ा प्रमाणावर विजय मिळाल्याने मतांमध्ये वाढ होणे हे स्वाभाविकच आहे. – सुहास पळशीकर, राजकीय भाष्यकार

मतांची टक्केवारी

पक्ष              २०१९   २०१४

भाजप         २७. ५९       २७.५६

शिवसेना       २३.२९  २०.८२

काँग्रेस            १६.२७  १८.२९

राष्ट्रवादी       १५.५२  १६.१२

बसपा            ०.८६   २.६३

इतर पक्ष       १४.५५ टक्के    —

(संदर्भ : निवडणूक आयोगाची आकडेवारी)