बेळगावमधील मनगुत्ती येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा हटवलेला पुतळा पुन्हा बसवावा, या मागणीसाठी कोल्हापुरातील शिवसैनिकांनी मंगळवारी थेट मनगुत्ती गावात धडक देत आंदोलन केले. शिवसैनिकांनी तत्पूर्वी बेळगाव जिल्ह्यात प्रवेश करून कवळीकट्टी ते मनगुत्ती असा दांडी मार्च काढत या घटनेच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. तसेच सरकारने शिवपुतळा लवकर न बसवल्यास तो शिवसेना आपल्या पद्धतीने बसवेल, असा इशाराही या वेळी देण्यात आला.

बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती येथील शिवपुतळा १५ दिवसापूर्वी कर्नाटक सरकारने हटवला होता. या घटनेचे सीमाभागासह महाराष्ट्रात सर्वत्र मोठे पडसाद उमटले होते. याची दखल घेत कर्नाटक प्रशासनाने आठवडय़ाभरात पुन्हा पुतळा बसवण्यात येईल, अशी घोषणा केली होती. मात्र अद्यापि हा पुतळा न बसल्याने आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी आज कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ मनगुत्तीमध्ये धडक मोर्चा काढला होता.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार व विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटकातील कवळीकट्टी ते मनगुत्ती अशा या मोर्चात शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते. भगवे झेंडे हाती घेतलेले हे शिवसैनिक शिवाजी महाराजांचा जयघोष करीत मनगुत्ती गावात धडकले. या आंदोलकांना मनगुत्ती गावच्या वेशीवर कर्नाटक पोलिसांनी अडवल्यावर शिवसैनिकांनी या ठिकाणी ठिय्या आंदोलन केले.

देवणे या वेळी म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रायगडवर जाऊन लोकसभेचा प्रचाराचा प्रारंभ करताना शिवाजी महाराजांचा सन्मान केला जाईल असे विधान केले होते. मात्र त्यांचेच राज्य असलेल्या कर्नाटकात शिवाजी महाराजांचा पुतळा एका रात्रीत काढला जातो.

ही घटना खूप चीड आणणारी आणि निषेधार्ह आहे. आम्ही कोणत्याही क्षणी मनगुत्तीमध्ये पुतळा बसवू असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.  दरम्यान, शिवसेनेच्या या आंदोलनामुळे मनगुत्ती गाव परिसराला पोलीस छावणीचे रूप आले होते. सध्या गावात कुणालाही प्रवेश दिला जात नाही.