राज्यसरकार पोकळ घोषणा नेहमी करते.आता ते महापुरुषाच्या कामाबाबतही खोटारडेपणा करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्याची घोषणा केली, पण आता पुतळयाची उंचीच कमी करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. युगपुरुषाच्या पुतळयाची उंची कमी करण्याचा प्रयत्न केला गेला तर महाराष्ट्रातील जनता भाजपाला माफ करणार नाही , अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यशासनावर येथे तोफ डागली .

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने येथील  दसरा चौकात हल्लाबोल यात्रेनिमित्त झालेल्या जाहीर सभेत पवार बोलत होते.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नाकर्त्यां सरकारच्याविरोधात हल्लाबोल आंदोलन सुरु केले आहे. चौथ्या टप्प्यातील या आंदोलनाची पहिल्या दिवसाची सांगता  येथे झाली.

या सभेत पवार , प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे , विधान परिषदेचे नेते धनंजय मुंढे यांनी सरकारवर चौफेर टोलेबाजी केली.  मुख्यमंत्री फडणवीस,  पालकमंत्री  चंद्रकांत पाटील, तसेच  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली.

विद्यमान सरकार मधील मंत्र्यांना काय बोलतो हेच कळत नाही, असा टोला लगावून पवार म्हणाले,देशाचे संविधान बदलण्याची भाषा केंद्रीय मंत्री अनंत हेगडे करत आहेत. अशी भाषा ते कशी वापरु शकतात.यांना सत्तेची  मस्ती आली आहे , अशी टीका त्यांनी केली.  बुलेट ट्रेनवरून त्यांनी मोदींवर निशाणा साधला.कुणाला तरी बरं वाटावं म्हणून बुलेट ट्रेनचा घाट घातला जातोय.त्यापेक्षा आधी कोल्हापूरचे स्टेशन नीट करा,सोयीसुविधा द्या,महिलांसाठी शौचालये उभारा, असा सल्लाही त्यांनी दिला.

महामित्र आणि डोनाल्ड ट्रम्प

सरकारच्यावतीने मुख्यमंत्री महामित्र नावाचे प्रमाणपत्र या मोहिमेमध्ये सहभागी झालेल्यांना देत असून यामध्येही घोटाळा झाल्याचा संशय विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला. यामध्ये  डोनाल्ड ट्रम्प , सनी लिओन ,अमिताभ बच्चन अशा नामांकितांचाही समावेश असल्याने हा बोगस प्रकार आहे .

आमदार हसन मुश्रीफ यांनी सरकारवर जोरदार हल्ला केला. त्यांनी, कोणत्याही परिस्थितीत ही सत्ता उलथवून टाकण्यासाठी क्षणभरही विश्रांती घ्यायची नाही, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले.

नालायक सरकारमध्ये शिवसेना कशी?

तटकरे यांनी शिवसेनेवरही टीकास्त्र सोडले. शिवसेनेचे सत्तेत १२ मंत्री आहेत, तरी त्यांचे पक्षप्रमुख सरकारला नालायक सरकार म्हणत आहे. मग त्या नालायक सरकारमध्ये तुम्ही कसे काय,  असा सवाल जनता विचारत असल्याचे  प्रदेशाध्यक्ष तटकरे म्हणाले.महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी मिळत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे हल्लाबोल आंदोलन असेच सुरु ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त  केला. कोल्हापूर हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांचा बालेकिल्ला राहिलेला आहे. आणि तो पुन्हा काबीज करण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहनही तटकरे यांनी या वेळी केले.