दयानंद लिपारे

पाच वर्षांची मुदत संपल्याने पदावरून पायउतार झालेले कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे मावळते कु लगुरू डॉ. देवानंद शिंदे यांची कारकीर्द विविध कारणांनी अधिकच वादग्रस्त ठरली. पाच वर्षांत विद्यापीठाचा कायापालट करण्याची संधी असताना विद्यार्थी, प्राध्यापक यांच्यावर आंदोलनाची वेळ आली होती.

शिवाजी विद्यापीठाचा पैस हा प्रामुख्याने कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्य़ातील ग्रामीण भागाशी निगडित आहे. विद्यापीठाची गुणवत्ता वाढवण्याचे अभिवचन डॉ. शिंदे यांनी कुलगुरुपदाची सूत्रे हाती घेताना दिले होते. त्यांनी कामाची सुरुवात तर चांगली केली होती. विद्यापीठात बेशिस्त कामकाजाला शिस्त लावण्याच्या दृष्टीने त्यांचा प्रयत्न राहिला. पण नंतर मात्र त्यावरील त्यांची पकड सुटली आणि विद्यापीठाच्या प्रशासकीय कामकाजातच ते अडकून पडले. अधिकारी, विभागप्रमुख यांच्या बदल्या करण्यात कमालीचा रस वाढल्याने त्यांनी अपेक्षित संधी हुकवली.

विद्यार्थ्यांमध्ये असंतोष

‘विद्यापीठे असंतोष आणि अराजकतेची केंद्रे बनली आहेत’ असे विधान शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. द. ना. धनागरे यांनी केले होते. या विधानाची प्रचीती यावी अशा अनेक घटना-घडामोडी डॉ. शिंदे यांच्या कारकीर्दीत घडल्या. विद्यार्थी विद्यापीठाच्या कामकाजाचा केंद्रबिंदू असतो. परंतु, परीक्षा गोंधळ, गुणपत्रिकांमधील अनागोंदी, अभ्यासक्रमाबाहेरचे प्रश्न, चुकीच्या सत्रातील प्रश्नपत्रिकांचे वितरण, उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत अनुत्तरित असल्याचा उल्लेख, गुणपत्रिका एका विषयाचे तर प्रमाणपत्र दुसऱ्या विषयाचे.. अशा भोंगळ कारभाराचे अनेक नमुने पाहून विद्यार्थी चक्रावले. विद्यापीठाच्या ग्रंथालयात गोंधळ, विद्यार्थी-विद्यार्थिनींची वसतिगृहे वर्षांनुवर्षे गळकीच राहणे अशा प्रकारांमुळे विद्यार्थ्यांमधील असंतोष खदखदत राहिला. त्यामुळे विद्यार्थ्यांना सातत्याने आंदोलन करणे भाग पडले.

डॉ. शिंदे हे विद्यापीठाचा लौकिक वाढत असल्याचा दावा सातत्याने करीत राहिले. प्रत्यक्षात मात्र संशोधन प्रवृत्ती दडपण्याचे काम होत राहिले. प्राध्यापकांनी प्रयत्न करून दहा-पंधरा लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणायचा पण या कामासाठी लाख-दोन लाख रुपये हवे असतील तर ते मंजूर करण्यासाठी कारकुनी दर्जाच्या प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी अरेरावी करायची; अशी प्रवृत्ती वाढत गेली. या कटू अनुभवावरून ‘संशोधनाचे कार्य नकोच बुवा’ असे म्हणत प्राध्यापक संशोधन कार्यापासून हात झटकून राहताना दिसत आहे.

डॉ. शिंदे यांनी मुंबई, पुणे या विद्यापीठांतही प्रभारी काम केल्याने प्रदीर्घ अनुभव त्यांच्या गाठीला होता. परंतु विद्यापीठातील शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शैक्षणिक सल्लागारपदी प्राचार्य डी. आर. मोरे यांची केलेली नियुक्ती वादग्रस्त ठरली. ही नेमणूक करताना नियम, मुलाखत प्रक्रिया यास बगल दिली. मोरे यांना राजीनामा देणे भाग तर पडले पण शिंदे यांच्या प्रतिमेला तडा गेला. केंद्रीय पातळीवरील विज्ञानाबाबत अनेक असंबद्ध विधाने मंत्र्यांनी केली असता त्याबाबत वैज्ञानिक असलेल्या डॉ. शिंदे यांना विचारणा केली असता ‘असे काही विधान आपल्या वाचनात नाही’ असे सांगून त्यांनी कानावर हात ठेवले.

५० लाख रुपये खर्च करून बंगल्याची दुरुस्ती, २० लाखाची आलिशान मोटार खरेदी, गणवेशधारी शिपायांचा लवाजमा घेऊन फिरणे, विविध महाविद्यालयांना भेट देण्याच्या नावाखाली केलेले पर्यटन यामुळे ते वादग्रस्तही ठरले. राज्य शासनाने ५० कोटी देण्याचा निर्णय जाहीर करूनही केवळ ३ कोटीचा निधी मिळाला. यात विद्यापीठ कमी पडले, अशीच टीका झाली. त्याची फिकीर न करता विद्यापीठातील प्रत्येक कार्यक्रमाला ‘इव्हेंट’चे स्वरूप देऊन ते प्रसिद्धीच्या झोतात राहिले. निवृत्त झाल्यावर पानभर जाहिरात देऊन कामे केल्याचा आभास निर्माण करण्याची वेळ त्यांच्यावर आली.

शिवाजी विद्यापीठात झालेल्या संशोधनाची यादी मोठी आहे. विद्यापीठाचा परिसर पाणीदार बनवला. विद्यार्थिनींसाठी मोफत बस पास देण्यात आले. लष्करातील जवानांच्या पाल्यांच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी विद्यापीठाने घेतली. परीक्षा, निकाल यामध्ये तांत्रिक स्वरूपाच्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. ‘सुटा’सारख्या प्राध्यापकांच्या संघटनेला काही विषय हाताळणे भाग असल्याने ते टीका करीत राहिले. एकंदरीत विद्यापीठातील सर्व घटकांचे प्रश्न सोडवल्याने कारकीर्द समाधानकारक आणि आनंद देणारी ठरली.

– डॉ. देवानंद शिंदे, माजी कुलगुरू ,  शिवाजी विद्यापीठ

माजी कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या कालावधीत अध्ययन, संशोधन, नावीन्यपूर्ण कार्य याबाबतीत भरीव काम झाले नाही. विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्यापासून विद्यापीठाने फारकत घेतल्याचे दिसून आले. प्राध्यापकांच्या संघटनेने प्रशासनाच्या १२९ प्रमादांची यादी देऊनही काहीच कारवाई केली नसल्याने ‘कुलगुरू शिंदे हटाव’ मोहीम राबवण्याची वेळ आली.

– प्रा. डॉ. सुभाष जाधव, सहकार्यवाह, ‘सुटा’

विद्यार्थ्यांचे काही प्रश्न डॉ. शिंदे यांनी सोडवले, पण अनेक रेंगाळत राहिले. परीक्षा, गुणपत्रिका यातील गोंधळामुळे विद्यार्थी त्रस्त झाले होते. विद्यापीठाचे सातारा आणि सांगली येथे उपकेंद्र सुरू करण्यासाठी पाठपुरावा करूनही त्यांनी दुर्लक्ष केले. विद्यार्थ्यांच्या अपेक्षा ते पूर्ण करू शकले नाहीत.

– अथर्व स्वामी, सहमंत्री, अभाविप, कोल्हापूर शहर.