शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेत प्रश्न विचारण्यावरून दोन गटात आखाडा रंगला. शिवाजी विद्यापीठातील प्राध्यापक संघटना असलेल्या ‘सुटा’च्या सदस्यांनी राज्यपालांनी शिवाजी विद्यापीठ प्रशासनाकडून सहकार्य केले जाईल असे आश्वस्त केले असताना सभेत प्रश्न विचारण्यास मनाई करून गळा घोटला जात आहे, असा आरोप करून विद्यापीठ प्रशासनाचा निषेध नोंदवला. तर, याच्या विरोधात विकास आघाडीने सभेशी संबंधित नसलेले प्रश्न उपस्थित करून चुकीचे प्रश्न विचारणाऱ्या ‘सुटा’चा धिक्कार करीत असल्याची घोषणाबाजी केली. कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे यांच्या समोरच हा गोंधळ सुरू राहिल्याने अधिसभेच्या शिस्त, गंभीर्याला गालबोट लागले.

शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेत संलग्न महाविद्यालये, मान्यताप्राप्त परिसंस्थांची तपासणी करण्यासाठी समिती गठीत करण्याचा तिसऱ्या क्रमांकाचा विषय चर्चेला आल्यावर वादाचा भडका उडाला. समितीमध्ये किती सदस्य असावेत, एकाहून अधिक समितीमध्ये काम करता येते का, याबाबतच्या कायदेशीर तरतुदी यावरून सुटाचा सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले. त्याचे समाधानकारक उत्तर प्रशासनाकडून मिळत नसल्याने प्रश्नाचा मारा सुरू ठेवला.यावर अर्धा तास उलट सुलट चर्चा रंगली. याचवेळी काही सदस्यांनी सुटाचा भूमिकेला आक्षेप घेतला. सुटा सदस्यांनाच किती बोलू देणार असा मुद्दा त्यांनी मांडला.

यावर सुटाकडून राज्यपालांच्या भेटीच्या तापशिलाचे जोड देत म्हणणे सुरू ठेवले. शिवाजी विद्यापीठ सहकार्य करण्याऐवजी गळा घोटण्याचे काम केले जात आहे. नियमावली पायदळी तुडवून समिती गठीत केली जात आहे. आम्हीही निवडून आलेले सदस्य असताना बोलण्याचा अधिकार हिरावून घेतला जात आहे. याचा निषेध नोंदवत आहे, अशा घोषणा सुटा सदस्यांनी देण्यास सुरुवात केली. सभेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

‘सुटा’च्या या वर्तनाला काही सदस्यांनी आक्षेप घेतला. सभेच्या पटलावरील विषय मांडण्याएवजी भलते विषय सुटाकडून मांडले जात आहेत. त्यांनी हेकेखोरपणा सोडावा, असे सांगत चुकीचे प्रश्न विचारणाऱ्या ‘सुटा’चा धिक्कार नोंदवत आहे, अशा प्रतिघोषणा सुरू झाल्या. या वादात अधिसभेच्या शिस्तीला बाधा येऊन सभेला आखाड्याचे स्वरूप प्राप्त झाले. सुटा सदस्यांनी तोंडाला काळ्या पट्या लावून सभेवर एकार्थाने बहिष्कार टाकल्यावर हा गोंधळ संपला.

पदवी प्रमाणपत्र विषयावरून अस्वस्थता
पदवी प्रमाणपत्राच्या दुबार छापाईवरून गेले काही दिवस कुलगुरू देवानंद शिंदे आणि प्रशासनाला विद्यार्थी संघटना , सुटा यांनी भंडावून सोडले आहे. आजच्या सभेत हा विषय उपस्थित झाल्यावर कुलगुरू शिंदे यांच्यासह प्रशासन कमालीचे अस्वस्थ झाल्याचे दिसून आले. २४ हजार विद्यार्थ्यांशी संबंधित या घोटाळ्यावर कोणती कारवाई केली, असा प्रश्न ‘सुटा’ने उपस्थित केला. त्यावर घाईघाईने पटलाशी कसा संबंधित नाही हे सांगण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू राहिला. सभागृहातील सुटा विरोधातील राजकारणही यावरून उफाळून आले. सुटाचे सदस्य नाहक बडबड करीत असल्याचा आरोप झाल्याने शाब्दिक चकमक सुरू राहिली.