कोल्हापूर : राज्य शासनाचा पहिला शिवस्वराज्य दिन रविवारी कोल्हापुरात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. कोल्हापूर जिल्हा परिषदेसह गावागावांमध्ये स्वराज्य गुढी उभी करण्यात आली.

ग्रामविकास विभागाने यंदा जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीमध्ये शिवस्वराज्य दिन साजरा करण्याचे आवाहन केले होते. कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते ‘शिवशक राजदंड स्वराज्य गुढी’उभारण्यात आली. ‘शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून राज्य सरकार सामान्य जनतेसाठी कार्यरत असून त्यांच्या विचारानेच राज्याची निश्चितपणे प्रगती होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या हस्ते दिवंगत परिचर सुरेश देशमुख यांच्या कुटुंबीयांना शासनातर्फे ५० लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. आरोग्य विभागाने दिलेल्या नऊ रुग्णवाहिकेच्या चाव्या पालकमंत्र्यांनी प्रदान केल्या.  फिरंगोजी शिंदे नाईक गिरगाव यांच्या पथकाने शिवकालीन मर्दानी खेळाचे सादरीकरण केले. शिवरायांचा दमदार आवाजातील पोवाडा सादर करण्यात आला. आमदार ऋतुराज पाटील, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.

येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पुतळ्यास मान्यवरांनी अभिवादन केले. पालकमंत्री सतेज पाटील, मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंतराव मुळीक, गुलाबराव घोरपडे,  राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी खासदार धनंजय महाडिक आदींनी अभिवादन केले. हर हर महादेव ,छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. फटाक्यांची आतषबाजी करून साखर-पेढे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.