21 October 2019

News Flash

शिवसेना आणि राष्ट्रवादी मोठय़ा भावांच्या भूमिकेत!

राज्यात सत्ताबदल झाल्यावर कोल्हापूर जिल्ह्य़ाला सत्तेत चांगले स्थान मिळाले.

(संग्रहित छायाचित्र)

दयानंद लिपारे

कोल्हापूरच्या राजकारणाचा बाज

लोकसभा आणि निवडणुकांचे कोल्हापूर जिल्हय़ात राजकीय पडघम वाजू लागले असून, इच्छुकांनी आपापल्या पद्धतीने मतदारसंघांची बांधणी सुरू केली आहे. याच वेळी आघाडी किंवा युती कशी होते यावरही बरेच अवलंबून असेल. जिल्ह्य़ात शिवसेना आणि राष्ट्रवादीची ताकद लक्षात घेता दोघांना मोठय़ा भावांची तर भाजप आणि काँग्रेसला छोटय़ा भावांची भूमिका वठवावी लागेल, अशीच चिन्हे आहेत.

राज्यात सत्ताबदल झाल्यावर कोल्हापूर जिल्ह्य़ाला सत्तेत चांगले स्थान मिळाले. चंद्रकांत पाटील यांच्याकडे महसूल व सार्वजनिक बांधकाम ही खाती आहेत. आधी त्यांच्याकडे सहकार हे खाते होते. राज्यात महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या चंद्रकांतदादांना कोल्हापूर जिल्ह्य़ात सुरक्षित मतदारसंघ मिळण्यासाठी अडथळ्यांची शर्यत पार करावी लागणार आहे.

चंद्रकांतदादांसाठी मतदारसंघाचा शोध

विधानसभेसाठी साधारण असेच चित्र दृष्टिपथात आहे. राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर), सत्यजित पाटील (शाहूवाडी), डॉ. सुजित मिणचेकर (हातकणंगले राखीव), चंद्रदीप नरके (करवीर), उल्हास पाटील (शिरोळ), प्रकाश आबिटकर (राधानगरी) या विधानसभेच्या सहा गडांवर शिवसेनेचे आमदार आहेत. साहजिकच तेथे पुन्हा विद्यमान आमदार रिंगणात उतरू शकतात.

भाजपचे सुरेश हाळवणकर (इचलकरंजी) व अमल महाडिक (कोल्हापूर दक्षिण) असे दोन आमदार आहेत. उर्वरित दोन ठिकाणी हसन मुश्रीफ (कागल) व संध्यादेवी कुपेकर (चंदगड) राष्ट्रवादीचे आमदार आहेत. विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे संख्याबळ शून्य आहे. म्हणजे येथेही अधिक जागांवर शिवसेनेचे उमेदवार असतील, भाजपला दुय्यम स्थान राहील. खेरीज, शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी शिवसैनिकांसह प्रचाराची मोहीम उघडावी लागेल. काँग्रेस-राष्ट्रवादीला समान पाच मतदारसंघ मिळतील. बहुसंख्य माजी आमदार पुन्हा आजी होण्यासाठी आतुर झालेले आहेत.

उभय काँग्रेसला एकमेकांचा तितकाच प्रचार करावा लागेल. यास्थितीचा विचार करता जिल्ह्यचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना मात्र मतदारसंघाचा शोध घ्यावा लागेल. शिवसेनेचे सहा व भाजपचे दोन वगळता राहतात अन्य दोन मतदारसंघ. पैकी कागलमध्ये त्यांनी म्हाडा पुणेचे अध्यक्ष समरजितसिंघ घाटगे यांची उमेदवारी जाहीर केली आहे, चंदगडमध्ये राहण्याचा इरादा दिसत नाही. त्यामुळे इतरांना निवडून आणण्यासाठी प्रय करणारे मंत्री पाटील हे मात्र मतदारसंघापासून दूर राहतील. भाजप- सेनेने स्वतंत्र चूल केली तर मात्र कोल्हापूर शहर वा त्यांचे मूळ गाव असलेल्या राधानगरी मतदारसंघाचा विचार ते प्राधान्याने करतील, अशी चिन्हे आहेत.

शिवसेना, राष्ट्रवादी जोमात

जागावाटपात विद्यमान लोकप्रतिनिधींना त्यांचा मतदारसंघ सोडला जातो, तसे संकेत आहेत. सध्याचे संख्याबळ बघितल्यास शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर सर्वाधिक जबाबदारी असणार आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या कोल्हापूर व हातकणंगले हे दोन्ही मतदारसंघ शिवसेना व राष्ट्रवादीच्या वाटय़ाला गेले आहेत. गेल्या वेळी राष्ट्रवादीने हातकणंगले मतदारसंघ काँग्रेसचे माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्यासाठी सोडला होता. पण आता तो त्यांनी आपल्याकडे ठेवला असून ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, खासदार राजू शेट्टी यांना देण्याचे जवळपास निश्चित केले आहे. तर, कोल्हापूर मतदारसंघाचे खासदार धनंजय महाडिक यांना पक्षांतर्गत आमदार हसन मुश्रीफ यांचा उघड विरोध असला तरी पुन्हा पक्षाने विद्यमान खासदारांना आखाडय़ात उतरवण्याचे ठरवले आहे. महाडिक यांच्या विरोधात गतवेळी लढत दिलेले शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र सहसंपर्क प्रमुख संजय मंडलिक यांचा सामना होण्याची शक्यता आहे. शेट्टी यांच्या विरोधात राष्ट्रवादीला रामराम ठोकून हाती शिवबंधन बांधलेले जिल्हा परिषदेंचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने यांचे नाव चर्चेत आहे. हे चित्र पाहता लोकसभा निवडणुकीची खरी मदार राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षांवर असणार आहे. हातकणंगले मतदारसंघ कृषी राज्यमंत्री सदाभाऊ  खोत यांच्यासाठी सोडला जावा असे भाजपचे प्रयत्न सुरू असून तसे झाल्यास भाजपवरही जबाबदारी येऊ  शकते. काँग्रेसला मात्र दोन्ही मतदारसंघांत आघाडीधर्म निभावावा लागणार आहे.

‘त्या’ घोषणा वल्गना ठरतील

गेल्या काही महिन्यांपासून कोल्हापूर जिल्ह्य़ातील सर्व पक्षांकडून संख्याबळ वाढवण्याच्या घोषणा सभा, बैठकांतून होत आहेत. दोन खासदार आणि सहा ते आठ आमदार निवडून आणण्याचा इरादा व्यक्त होत आहे. मात्र, युती आणि आघाडी असे बेरजेचे समीकरण आकाराला आले की, हा दावा निखालसपणे फोल ठरणार आहे. मुळात जागावाटपात घोषणा केल्या आहेत

इतपत मतदारसंघ वाटय़ाला येण्याची शक्यता कमी. त्यातही सर्वच जागांवर विजय मिळवणे कोणत्याही पक्षाला वाटते तितके सोपे नाही. त्यामुळे राणाभीमदेवी थाटात घोषणांचा सुकाळ असला तरी कोणत्याही पक्षाला सर्व जागांवर निर्भेळ विजयाची शक्यता नाही. निम्म्या जागांवर  विजय खेचून आणला तरी ‘घोडे पंचगंगेत न्हायल्या’सारखे असणार आहे.

First Published on January 2, 2019 2:16 am

Web Title: shivsena and ncp played big brothers