संजय मंडलिक यांचा आरोप, पालकमंत्र्यांकडूनच बंडखोरीला प्रोत्साहन

कोल्हापूर जिल्ह्यत चंद्रकांत पाटील यांनीच भाजपच्या उमेदवारांना बंडखोरी करायला सांगितली. शिवसेनेला कमी जागा याव्यात हा त्यांचा यामागचा उद्देश होता, असा आरोप शिवसेना खासदार संजय मंडलिक यांनी केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यत युतीची  पीछेहाट  होण्याला खासदार संजय मंडलिक जबाबदार आहेत, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला होता. याच आरोपाला आता  मंडलिक यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

चंद्रकांत पाटील यांच्याकडे त्यांच्या पक्षाने मोठी जबाबदारी दिली. अशात त्यांना कोल्हापुरातील युतीच्या पराभवाचे खापर जर चार महिन्यापूर्वी खासदार झालेल्या माझ्यावर फोडायचे असेल तर काय बोलायचे ? असा सवालही मंडलिक यांनी उपस्थित केला आहे. या निवडणूक निकालाबाबत सगळ्यांनीच आत्मपरीक्षण केलं पाहिजे असेही मंडलिक यांनी म्हटले आहे.

पत्रकारांशी बोलताना मंडलिक म्हणाले,की कोल्हापूर जिल्ह्यत शिवसेना आणि भाजपाची जी पीछेहाट झाली, पराभव झाला त्याला चंद्रकांत पाटील कारणीभूत आहेत. कारण  त्यांनीच जनसुराज्य शक्ती पक्षातून भाजपच्या उमेदवारांना बंडखोरी करायला सांगितले होते.

शिवसेनेला कोल्हापुरात भाजपापेक्षा जास्त जागा मिळाल्या म्हणून पाटील यांनी बंडखोरी करायला सांगितल्याने शिवसेनेचे नुकसान झाले, असा आरोपही संजय मंडलिक यांनी केला.

इतकेच नाही, तर पाटील जिल्ह्यचे पालकमंत्री आहेत तर पक्षातली बंडखोरी त्यांनी का थांबवली नाही? ती होऊ  का दिली? याचा विचार केला तर संशय घ्यायला जागा नक्कीच आहे असेही  मंडलिक यांनी नमूद केले आहे.

सगळ्यांनाच आत्मपरीक्षणाची गरज

निवडणूक निकालाबाबतही संजय मंडलिक यांनी भाष्य केले. या निवडणूक निकालाबाबत सगळ्याच पक्षांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. प्रत्येक निवडणुकीचे संदर्भ लक्षात घेऊ न मतदारराजा त्याप्रमाणे विचार करतो , ही बाब लक्षात घ्यायला हवी. लोकसभेच्या वेळी संदर्भ वेगळे होते. आता विधानसभेच्या वेळी संदर्भ वेगळे होते, त्यातून अपेक्षित निकाल लागले नाहीत.  चंद्रकांत पाटील यांनी माझ्यावर केलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही ,असेही मंडलिक यांनी स्पष्ट केलें. कोल्हापूर जिल्ह्यत संजय मंडलिक यांनी सोयीचं राजकारण केल्यामुळे भाजपा आणि शिवसेनेचा पराभव झाला असा आरोप  पाटील यांनी केला होता. याच आरोपाला मंडलिक यांनी प्रत्युत्तर दिले आहे.