विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने गती घेतली असताना कोल्हापूर शहरातील शिवसेनेत सुंदोपसुंदी असल्याचे चित्र आहे. शहरातील शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसच्या उमेदवारांचा हात धरला आहे. आमदार राजेश क्षीरसागर आणि जुने पदाधिकारी अशी विभागणी झाली आहे. जुन्या पदाधिकाऱ्यांनी कॉंग्रेसचे उमदेवार चंद्रकांत जाधव  यांचा खुलेआम प्रचार चालवला असून त्यांना भाजपातील काही लोकांनी छुपा पाठिंबा दिला आहे. त्यामुळे प्रचाराच्या ऐन धुमाळीत शिवसेना आणि भाजप यांच्यातील उफाळलेली गटबाजी वेगळ्या राजकीय वळणावर आली आहे. मंगळवारी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा प्रचार दौरा असून ते पक्ष विरोधी भूमिका घेणाऱ्म्य़ाना कोणता इशारा देणार याकडे लक्ष लागले आहे.

कोल्हापूर शहरातून सुरुवातीला चंद्रकांत पाटील निवडणुकीस उभे राहणार असल्याची चर्चा होती. महायुतीची घोषणा झाल्यानंतर क्षीरसागर यांनाच उमेदवारी जाहीर झाल्यावर काँग्रेस कडूनही अखेरच्या दिवशी मूळ भाजपमध्ये असलेले उद्योगपती जाधव यांच्या उमेदवारीची घोषणा झाली. आता काँग्रेस—राष्ट्रवादीच्या साथीला शिवसेनेचा एक गट मदत करत असल्याने क्षीरसागर यांची डोकेदुखी वाढली आहे.

परिणामी अमित शहा यांच्या सभेला सेनेचे जिल्हा अध्यक्ष संजय पवार , खासदार प्रा. संजय मंडलिक, आमदार चंद्रदीप नरके, आमदार सत्यजित पाटील, यांच्यासह प्रमुख कार्यकत्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. शिवसेनेतील एक गट  क्षीरसागर यांच्या कार्यशैलीवर नाराज होऊ न जाधव यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. कोणी पडद्याआड  राहून जाधवांना पूरक भूमिका घेत आहेत. याच कारणातून भाजपचे माजी शहर अध्यक्ष संदीप देसाई यांचे निलंबन केले आहे.

शिवसेनेचे जिल्ह्यतील वरिष्ठ व जुने पदाधिकारी आणि आमदार यांच्यामध्ये सख्य नाही. शहराचे प्रमुखपद भूषविलेले माजी पदाधिकारीही आमदारांसोबत नाहीत. मंगळवार पेठेतील काही पदाधिकारी स्थानिक उमेदवार म्हणून काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारात आहेत. महापालिका निवडणुकीत तिकीट न मिळाल्याचा राग काही जण आजही आळवत असून काँग्रेसला पूरक भूमिका निभावत आहेत. यामुळे उद्या ठाकरे कोणता प्रहार करणार हे लक्षवेधी ठरले आहे.