इचलकरंजी येथील शुभम मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थेने अनुदानाचा ८८ लाख ५७ हजार ६४३ रुपयांचा अपहार केल्याची फिर्याद लेखापरीक्षक व्यंकटेश भीमराव कुलकर्णी (वय ४६, रा. गडिहग्लज) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दिली.
पोलिसांनी या प्रकरणी संस्थेचे अध्यक्ष अमर नानासाहेब पारडे, लक्ष्मण अर्जुन काळे व जे. एम. लाइट हाऊस या विद्युत साहित्याचा पुरवठा करणाऱ्या दुकान चालकावर गुन्हा दाखल केला आहे. अमर पारडे हे अध्यक्ष असलेल्या शुभम मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थेने राज्य शासनाकडे अॅल्युमिनियम खिडकी उत्पादनासाठी ६ कोटी ८० लाख रुपयांचा प्रस्ताव सादर केला होता. शासनाने संस्थेला ५० लाख शासकीय भागभांडवल व ५० लाख दीर्घ मुदतीचे कर्ज असे १ कोटी रुपये अदा केले आहेत. रक्कम मिळाल्यानंतर पारडे यांनी ७९ लाख रुपये येथील सन्मती बँकेत ठेव ठेवली. या ठेवीवर पारडे व काळे यांनी ३२ लाख ३० हजार रुपयांचे ठेवतारण कर्ज काढले. या कर्जाची रक्कम संस्थेत जमा न करता स्वत: वापरली. त्या कर्जाची व्याजासह रक्कम ४९ लाख ९५ हजार ६४३ इतकी झाली आहे. त्यानंतर ३८ लाख ६२ हजार रुपये पारडे व काळे यांनी जे. एम. लाइट हाऊस यांना कामापोटी संस्थेचे बांधकाम अपुरे असताना देऊन गरव्यवहार केल्याचे लेखापरीक्षक कुलकर्णी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 5, 2016 1:40 am