महाराष्ट्राचे सुपुत्र कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटी व इचलकरंजी विधानसभा युवक काँग्रेसतर्फे शनिवारी स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली. शहर काँग्रेस कमिटीच्या स्वाक्षरी मोहिमेस उदंड प्रतिसाद मिळून दिवसभरात सुमारे १० हजार स्वाक्षऱ्यांची नोंद झाली. त्या अंतर्गत जमा केलेल्या सह्यांचे निवेदन प्रांताधिकारी यांना देऊन भारत सरकारने आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न करून जाधव यांची तातडीने सुटका करावी, अशी मागणी करण्यात आली.

माजी नौसेना अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी लष्करी कोर्टाच्या माध्यमातून फाशीची शिक्षा सुनावली. सर्व आंतरराष्ट्रीय कायद्यांचा भंग करून जाधव यांना सुनावलेल्या शिक्षेचा निषेध करत जाधव त्यांची तातडीने सुटका करावी, या मागणीसाठी इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटी आणि इचलकरंजी विधानसभा युवक काँग्रेस यांच्या वतीने स्वाक्षरी मोहिमेस इचलकरंजीत प्रारंभ करण्यात आला. माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी स्वाक्षरी करून या अभियानाला सुरुवात केली.

अभियानासाठी १५  ठिकाणी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले होते. तसेच शहर व परिसरातील शाळा, महाविद्यालयांना भेटी देऊन विद्यार्थी-विद्यार्थिनींना या अभियानात सहभागी करून घेतले. नगरसेवक शशांक बावचकर, संजय केंगार, इचलकरंजी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष अमृत भोसले, राजू बोंद्रे आदींनी मनोगत व्यक्त केले.

या प्रसंगी शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश मोरे, प्रकाशराव सातपुते, अशोकराव सौंदत्तीकर आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकत्रे उपस्थित होते.