येथील राजर्षी छ. शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शेंडापार्कातील कॅन्टीनमध्ये रॅिगगच्या कारणावरून शनिवारी जोरदार हाणामारी होऊन वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या सहा विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करण्यात आली. पकी जयंत रमेश तोंडे (पाथर्डी, अहमदनगर) हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. परराज्यातील सहा सिनिअर विद्यार्थ्यांनी रॅगींगमधूनच ज्युनिर्असना मारहाण केली असल्याची लेखी तक्रार वरिष्ठांकडे केली असून या प्रकरणाची दोन वेगवेगळ्या समितीतर्फे चौकशी सुरू आहे. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिले.
शेंडापार्क येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वसतिगृह आहे. याठिकाणी कॅन्टीनचीही सोय आहे. जयंत तोंडे हा एमबीबीएसच्या द्वितीय वर्षांत शिकत असून काही दिवसापूर्वी सहा ते सात सिनिअर विद्यार्थ्यांनी त्यांचे रॅगींग करण्याचा प्रयत्न केला. पण त्यास जयंत व त्याच्या मित्राने दाद दिली नाही. हा प्रकार जयंतच्या मित्रांना समजल्याने ते याठिकाणी दाखल झाले. त्यावेळी काहीजणांच्या मध्यस्थीने हा वाद मिटला होता. शनिवारी सकाळच्या सुमारास जयंत तोंडे हा कॅन्टीनमध्ये नाष्टा करण्यासाठी गेला असताना सदरील सहा विद्यार्थ्यांनी त्याच्याशी भांडण काढले. जयंतने हा प्रकार मित्रांना सांगितला असता सर्वजण जाब विचारण्यासाठी पुन्हा कॅन्टीनमध्ये आले. त्यावेळी वादाचे पर्यावसान हाणामारीत होऊन रॅगींग करणाऱ्या सहाजणांनी जयंतसह त्याच्या मित्रांना बेदम मारहाण केली. जयंतच्या डोक्यात खुर्ची घातल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. याबाबतची लेखी तक्रार १४० विद्यार्थ्यांनी केली. जोपर्यंत रॅगींग करणाऱ्या सहा विद्यार्थ्यांवर कडक कारवाई केली जात नाही तो पर्यंत वर्गात न बसण्याचा इशारा दिला आहे.