यंत्रमागधारक प्रतिनिधींची स्मृती इराणींसोबत राष्ट्रव्यापी बैठक

दिल्ली दरबारी वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे यंत्रमागधारक प्रतिनिधींची राष्ट्रव्यापी बैठक होऊन सर्व समस्यांवर मार्ग काढण्यात येईल, अशी हवा केलेली बठक फुसका बार ठरली. ना या बठकीत थेट कोणती घोषणा करण्यात आली, ना कसले ठाम आश्वासन देण्यात आले.  विणकरांना उघड्यावर पडू देणार नाही, शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल, असे इराणी यांचे माफक बोल ऐकून यंत्रमागधारक प्रतिनिधींना रिकाम्या हाताने परतावे लागले.

दिल्ली येथे वस्त्रोद्योगावरील संकटावर विचार विनिमय करून उपाय योजना करण्यासाठी बठक आयोजित केली होती. केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री अजय टमटा, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री  डॉ. सुभाष भामरे, खासदार राजू शेट्टी आदींची प्रमुख उपस्थिती होती. सध्या वस्त्रोद्योगात आíथक मंदीची लाट आहे. मंदीमुळे कापड उद्योग धोक्यात आला असून कामगार वर्गाचीही उपासमार होत चालली आहे. इचलकरंजीतील यंत्रमागधारक संघटनांचे प्रतिनिधी, सूत गिरण्यांचे पदाधिकारी, सूत व कापड व्यापारी यांच्याशी चर्चा करून खासदार शेट्टी यांच्या पाठपुराव्यामुळे देशभरातील यंत्रमागधारकांची बठक आयोजित केली होती.

बठकीत खासदार शेट्टी यांनी, मागण्या ऐकण्याऐवजी आलेल्या प्रतिनिधींना वेळ द्यावा, यंत्रमागधारकांची अवस्था बिकट असून काही यंत्रमागधारकांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे या उद्योगाला विशेष आíथक पॅकेज जाहीर करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले .उत्पादक ते ग्राहक यांच्यात तफावत असून त्याला शिस्त लावणे गरजेचे आहे. यासाठी केंद्राने त्वरित विशेष आíथक पॅकेज जाहीर करावे अशी मागणी त्यांनी केली.

या वेळी कापड उद्योग स्थिरस्थावर करण्यासाठी सूत दरातील चढ-उतार, तसेच सट्टा खेळणाऱ्यांवर कडक कारवाई करुन कापसाला वायदेबाजारातून वगळावे, यंत्रमागधारकांना कमी दरात वीज पुरवठा करावा आदी मागण्याही  इराणी यांच्याकडे करण्यात आल्या. देशातील एकूण कापडाची गरज, एकूण होणारी निर्यात व त्याला लागणारा कापूस याचा विचार करून शासनाने एक वष्रे आधीच कापड संदर्भातील धोरण अवलंबावे, त्यामुळे उद्योगालाही स्थिर दरात कापूस उपलब्ध होईल असे मत मांडण्यात आले. बठकीस खासदार कपिल पाटील, खासदार असुद्दीन ओवेसी, खासदार के. आर. पाटील, खासदार माझिद मेनन, माजी खासदार सुरेश तावरे, इचलकरंजी पॉवरलूम असोशिएशनचे सतिश कोष्टी, यंत्रमागधारक जागृती संघटनेचे विनय महाजन, कोल्हापूर जिल्हा पॉवरलूम असोशिएशनचे दीपक राशिनकर, राष्ट्रवादी पॉवरलूम असोशिएशनचे विश्वनाथ मेटे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.