घरगुती गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर करवीर नगरीतील सार्वजनिक तरुण मंडळांनी देखावे निर्मितीवर लक्ष केंद्रित केले आहे. देखावे खुले होऊ लागले असून नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्रिबदू बनलेल्या देखाव्यांच्या ठिकाणी गर्दी होऊ लागली आहे. नावीन्यपूर्ण देखावे दाखल करण्याचा प्रयत्न बहुतेक मंडळांचा आहे.
करवीरनगरीत गणेशोत्सव मोठय़ा झोकात साजरा केला जातो. घरगुती गणरायाचे विसर्जन झाल्यानंतर तरुण मंडळांचे लक्ष देखावे निर्मितीकडे असते. धार्मिक-पौराणिक विषयावर आधारित देखावे आजही बनविले जातात. त्याच जोडीला आधुनिक तंत्रज्ञानाचा मागोवा घेण्याचा प्रयत्नही काही मंडळे करताना दिसतात. तर गणेशोत्सवाचे निमित्त साधत सामाजिक बांधिलकी जपणारे देखावेही निर्माण करण्याकडे कल वाढत चालला आहे. महिला सक्षमीकरण, मातृपितृ देवो भव, अंधश्रध्दा निर्मूलन, स्मार्ट सिटी, स्वच्छता अभियान, वनांचा ऱ्हास, गडकिल्ले संवर्धन अशा सामाजिक आणि विधायक विषयांवर केलेले देखावे नागरिकांच्याही पसंतीस उतरले आहेत.
सोल्जर ग्रुपने मदर इंडियाफेम बिरजू गणेश हा देखावा केला आहे. गणराया बळीराजाच्या भूमिकेत येथे दिसत आहे. दि ग्रेट मराठा मंडळाने गणरायाची ब्रह्मांड प्रदक्षिणा दर्शविणारा देखावा उभा केला आहे. मृत्युंजय तरुण मंडळाच्या प्राचीन कालचे मंदिर लक्षवेधी ठरले आहे. बागेत गेलेल्या मुलांना झोक्यात बसण्याचा आनंद नेहमीच घ्यावासा वाटतो. याच धर्तीवर म्हसोबा देवालय ट्रस्टने बागेमध्ये झोका घेणा-या बालगणेशाचा देखावा उभा केला आहे.
आजचे जग संगणक-मोबाईलभोवती गुंतले गेले असून त्यावर आधारित खेळ मुलांना मोहात पाडत असतात. या पाश्र्वभूमीवर जुन्या काळातील खेळांची आठवण करून देणारा हत्यार ग्रुपचा विटू-दांडी खेळणारा बालगणेश लक्षवेधी बनला आहे. तर, द्विमुखी मारुती तरुण मंडळाने आंबे तोडणा-या गणेशाचा देखावा केला आहे. क्रांतिवीर राजगुरु तरुण मंडळाने गडकिल्ले संवर्धनाचा, शिपुगडे तालीम मंडळाने अंधश्रध्दा निर्मूलनाचा, तर जुना बुधवार तालीम मंडळाने बाबा आमटे यांच्यावर देखावा उभा करत सामाजिक बांधीलकी जपली आहे.
याशिवाय, काही गणेश मंडळांनी आकर्षक गणेशमूर्ती, मंडपाची सजावट यावर भर दिला आहे. राजारामपूरी तरुण मंडळाचे विद्युत रोषणाई झळाळून निघणारा महल लक्षवेधी ठरला आहे. चॉईस तरुण मंडळाने तारेवरची कसरत करणा-या गणरायाला डोंबा-याच्या खेळाच्या रूपात दाखविले आहे. वृक्षतोडीच्या विरोधात संदेश देणारी सस्पेन्स मंडळाची श्री मूर्ती अंतर्मुख करायला लावणारी आहे. बालावधूत तरुण मंडळाने असंख्य मयूर प्रतिमांद्वारे श्री गणेशाची आगळी मूर्ती बनविली आहे. दिलबहार तालमीने ‘दख्खनचा राजा’ या नावाचा लक्षवेधी महल उभा केला आहे. राक्षसी वृत्तीचा नि:पात करणा-या गणरायाची अष्टविनायक तरुण मंडळाने उभे केलेली प्रतिमा अनेकांच्या मनात घर केली आहे.