पारंपरिक पद्धतीने साज-या होणा-या उत्सवाला आधुनिकतेची झालर लागली हे एका दृष्टीने चांगले असले तरी चांगल्याऐवजी बीभत्सपणाचे स्वरूप प्राप्त होताना दिसत आहे. पण वस्त्रनगरी इचलकरंजीने समाजप्रबोधनाचा वसा या आधुनिक युगातही कायमपणे जोपासला आहे. विविध देखाव्यांच्या आणि गणेशमूर्तीच्या माध्यमातून प्रबोधनात्मक संदेश हेच यंदाच्या गणेशोत्सवाचे वैशिष्टय़ आहे. यंदाच्या उत्सवात जय मल्हार, बाहुबली यांसह झाडे वाचवा, देश वाचवा असे संदेश देणा-या श्री मूर्तीची छाप अधिक दिसून लागल्याने गणेशोत्सव विधायकतेच्या वळणावर येऊन पोहोचल्याच्या समाधानकारक प्रतिक्रिया उमटत आहेत.
शहरातील गांधी कॅम्प गणेशोत्सव मंडळाने आपली पौराणिक देखाव्यांची परंपरा कायम राखली आहे. तर गावभागातील जयभवानी, जय शिवराय, श्रीराम जयराम जयजय राम, एस.टी. ग्रुप, युवा ग्रुप यांच्यासह अनेक मंडळांनी झाडे लावा, झाडे जगवा, स्वच्छता, देश बचाव असे विविध समाजप्रबोधनाचे संदेश दिले आहेत. तर बहुतांशी मंडळांनी भव्य आणि आकर्षक मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. बदलत्या युगात उत्सवांचे स्वरूपही बदलत चालले आहे. त्यामध्ये गणेशोत्सव कसा मागे राहील. आधी श्रींची लहान मूर्तीची प्रतिष्ठापना करून विविध देखाव्यांचे सादरीकरण करून जनजागृती केली जायची. पण आता लहान मूर्तीऐवजी भव्यदिव्य मूर्ती बसवण्याकडे अधिक कल दिसून येत आहे. काही मोजकीच मंडळे वगळता देखावेच इतिहासजमा होत चालल्याचे दिसत आहे.
६७वे वर्ष साजरे करणा-या गावभागातील जयभवानी गणेशोत्सव मंडळाची तर ऐतिहासिक देखाव्यांसाठी सर्वदूर ख्याती आहे. यंदाच्या वर्षी त्यांनी झाडे लावा झाडे जगवा आणि देश वाचवा असा संदेश श्रींच्या मूर्तीच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे. शंकर आणि पार्वती यांच्या हातावर पृथ्वी आणि त्यावर झाडाला घट्ट मिठी मारलेला गणराया ही मूर्ती सर्वाचेच लक्ष वेधून घेत आहे. पर्यावरणाची मानवाकडून होत असलेली ऱ्हास रोखण्यासाठी विविध संदेशांचे फलकही मंडपासमोर लावण्यात आलेले आहेत.
जय शिवराय मंडळाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वच्छ भारत अभियान साकारले आहे. गणराया उंदीरमामांच्या सहकार्याने स्वच्छता अभियान राबविण्यास निघाला असल्याचे दाखवले आहे. ‘शाळेहून नाही थोर ते मंदिर, देणगी उदार शाळेला द्या, भक्तीचा प्रसार नाही श्रेयस्कर, स्वच्छतेचा प्रसार सर्वश्रेष्ठ’ या संत गाडगेबाबांच्या ओळीतून नागरिकांना स्वच्छतेबाबत संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. श्रीराम जयराम जयजय राम या मंडळाने राज्यात सर्वत्र उद्भवलेली दुष्काळाची परिस्थिती आणि त्याला कंटाळून आत्महत्या करणारा शेतकरी असा देखावा उभारला आहे. ९ फुटी उंचीचा इको फेंडली गणराया शेतक-याला आत्महत्या करण्यापासून रोखत असल्याचे सादरीकरण केले आहे. त्याचबरोबर परिस्थिती दर्शविणारे फलकही लावले आहेत.
अवधूत आखाडा परिसरातील एस. टी. ग्रुपने झाडे वाचवा, पृथ्वी वाचवा असा समाजप्रबोधनात्मक संदेश श्रींच्या रूपातून दिला आहे. पृथ्वीवर झाडाच्या समोर उभारून झाड तोडणा-या व्यक्ती त्यापासून प्रवृत्त करण्याचा प्रयत्न गणेश करीत असल्याचे दाखवले आहे. त्याचबरोबर गांधी-विकासनगर परिसरात कबनूरचा मानाचा गणेश ही भव्य सिंहासनारूढ मूर्ती साकारण्यात आली आहे. तसेच रसना कॉर्नर, झेंडा चौक (जय मल्हार), बल्ल्या ग्रुप (सिंहावर आरूढ), होंडा हायकर्स (बठी मूर्ती), अण्णा कावतील (जास्वंदीच्या फुलावर विराजमान), जमीर ग्रुप (िशपल्यात बसलेला व मत्स्यकन्या ओढत नेताना), श्री गणेश मंडळ (डफली वाजवताना), राणाप्रताप (भव्य बठी मूर्ती), जगताप तालीम मंडळ (राजहंसवर विराजमान), नवतारा मंडळ (सासन काठी नाचवताना), सन्मित्र युवक मंडळ (कबड्डी खेळणारा गणेश), नवरत्न टायगर्स (परी गणरायाला उचलून नेताना), पंत मळा मंडळ (कासवावर आरूढ), गांधी चौक मंडळ (मणिमल्ल संहारक खंडोबा) अशा भव्य आणि आकर्षक मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली आहे. विविध संदेशाबरोबरच शहरातील मंडळांनी गणरायाच्या माध्यमातून वेगवेगळे समाजप्रबोधन व जनजागृती करणारे संदेश दिले आहेत.