18 March 2019

News Flash

कोल्हापुरात यंदा ‘माणुसकी’बरोबर ‘आपुलकीची भिंत’!

विधायक उपक्रमातही राजकीय स्पर्धा

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

|| दयानंद लिपारे

विधायक उपक्रमातही राजकीय स्पर्धा

लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराने आणि त्यांच्यातील सुप्त स्पर्धेमुळे कोल्हापुरातील हजारो गरिबांना शुक्रवारी मोफत कपडे मिळाले. दरवर्षी गरिबांच्या मदतीसाठी उभ्या राहणाऱ्या ‘माणुसकीची  भिंत’ पुढे ‘आपुलकीची भिंत’ने स्पर्धा निर्माण केल्याने यंदा गरिबांच्या वाटय़ाला चार कपडे जास्त आले आणि त्यांची दिवाळी गोड झाली.

आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून ‘माणुसकीची भिंत’ हा उपक्रम राबवला जातो. यंदाही शहरातील ‘सीपीआर’ चौकात हा उपक्रम राबविण्यात आला. शहरातील शेकडो नागरिकांनी त्यांना नको असलेले पण चांगल्या स्थितीतील कपडे या भिंतीवर दान केले.

संयोजकांनी दान म्हणून आलेले कपडे हारीने मांडून ठेवले. गरजू लोकांनी आपली पसंत आणि माप यानुसार हवे ते कपडे घरी नेले. आठ हजारांहून अधिक लोकांनी याचा लाभ घेतल्याचे संयोजकांनी सांगितले.

या वेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी, समाजात सकारात्मक चळवळ उभी करण्याचे काम ‘माणुसकीची भिंत’ करत असल्याचा गौरव केला. आमदार पाटील म्हणाले, आपल्याला नको असलेले समाजातील गरजूंना द्यावे या संकल्पनेतून तिसऱ्या वर्षी हा उपक्रम हाती घेतला आहे. आता ही संकल्पना कोल्हापूरपुरती मर्यादित न राहता मुंबई, पुणे आणि सांगली या ठिकाणी पोहोचली आहे.

समाजकार्यातही राजकीय स्पर्धा

दरम्यान, सतेज पाटील यांची ‘माणुसकीची भिंत’ कोल्हापुरात लोकप्रिय होऊ लागताच त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी खासदार धनंजय महाडिक यांनी यंदा ‘आपुलकीची भिंत’ या नावाने उपक्रम राबवला आहे. या उपक्रमात त्यांनी लोकांकडील कपडे गोळा करण्याऐवजी थेट नवीन कपडे वाटण्याचा ‘पराक्रम’ केला आहे.

महाडिक उद्योग समूहाच्या वतीने आयोजित या ‘आपुलकीची भिंत’ उपक्रमातून दहा हजार नव्या कोऱ्या कपडय़ांचे हजारो गरीब नागरिकांना वाटप करण्यात आले. कोल्हापूरच्या राजकारणात सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्यातील राजकीय स्पर्धेची सतत चर्चा असते. या स्पर्धेत आता या मदतीच्या भिंतीही अवतरल्या आहेत.

First Published on November 4, 2018 12:09 am

Web Title: social work in kolhapur