राज्यातील विद्यापीठांचे जागतिक विद्यापीठांशी सामंजस्य करारांच्या माध्यमातून शैक्षणिक, संशोधकीय संबंध प्रस्थापित होणे ही काळाची गरज आहेच, पण जागतिक संवाद वाढविताना स्थानिक संवाद वाढविण्याकडेही जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे. स्थानिक कृषी, अकृषी, तांत्रिक अशा सर्व प्रकारच्या विद्यापीठांच्या संवादातून शिक्षण क्षेत्रातील बदलत्या वाऱ्यांना सामोरे जाण्याची आणि समाजाला नव्या प्रगल्भ विचारधारेच्या दिशेने घेऊन जाण्याची क्षमता विकसित होईल, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या ५३ वा वर्धापन दिन समारंभ बुधवारी उत्साहात साजरा झाला. या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून देशमुख बोलत होते. राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद िशदे होते.
चारित्र्य, मनाचा कणखरपणा व सर्व कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची क्षमता शिक्षणातून विकसित होते, असे सांगून डॉ. देशमुख म्हणाले, आज पारंपरिक शिक्षणाबरोबरच अभिनव आणि कालानुरुप अभ्यासक्रमांच्या आखणीची आवश्यकता निर्माण झालेली आहे. पदवी स्तरावरील शिक्षणाकडून पदव्युत्तर शिक्षणाकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अवघे सात टक्के आहे. अशा विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने दूरस्थ शिक्षण पद्धतीचा उत्तम प्रकारे वापर करता येऊ शकतो. त्याचप्रमाणे पदवी स्तरापासूनच पदविका, उच्च-पदविका आणि पदवी अभ्यासक्रम यांची लवचीक निर्मिती करून विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार कौशल्यानुसार शिक्षण देण्याची पद्धती अंगीकारण्याचीही गरज निर्माण झाली असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद िशदे यांनी शिवाजी विद्यापीठामार्फत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने राष्ट्रीय पुरस्काराची निर्मिती करण्याची घोषणा केली. त्याचप्रमाणे विद्यापीठातील व महाविद्यालयांतील शिक्षक, विद्यार्थ्यांना संशोधनासाठी प्रेरित करण्यासाठी अभिनव योजनांची घोषणाही त्यांनी केली.
या समारंभात शिवाजी विद्यापीठाच्या पेमेंट गेटवे, एम्प्लॉईज कॉर्नर व कॉलेज कनेक्टीव्हीटी सेवांचे प्रमुख पाहुणे डॉ. देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तसेच, विद्यापीठातील, महाविद्यालयांतील गुणवंत शिक्षक, प्रशासकीय सेवक, त्यांची गुणवंत पाल्ये यांचा विद्यापीठ प्रशासकीय तसेच कल्याण निधी पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला. तसेच, प्रशासकीय गुणवत्ता अभियानांतर्गत पुरस्कार प्राप्त प्रशासकीय विभाग व अधिविभाग यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आले.
प्रास्ताविक विद्यापीठाचे बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे यांनी केले. जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर व वरिष्ठ सहायक नंदिनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी आभार मानले.