दुधापाठोपाठ भुकटीची विक्रीही थंडावली; राज्यात ५० हजार टन साठा पडून

दयानंद लिपारे

टाळेबंदीनंतर सर्वत्र घटलेल्या दूध विक्रीस पर्याय म्हणून मोठय़ा प्रमाणात तयार केलेले दूध भुकटीचे साठेही आता विक्रीअभावी गोदामात पडून राहू लागले आहेत. एकटय़ा महाराष्ट्रात ५० हजार टनांहून अधिक दूध भुकटी पडून आहे.

दूध भुकटीचे देशांतर्गत तसेच जागतिक व्यवहार ठप्प झाल्याने हा परिणाम झाला आहे. अगोदरच थंडावलेली दूध विक्री आणि त्यात आता दूध भुकटीवर आलेल्या या संकटाने राज्यातील बहुतांश दूध संघ आर्थिक अडचणीत येण्याची भीती आहे.  टाळेबंदीच्या अडथळय़ांमुळे सुरुवातीला दूध संकलनावर परिणाम होऊ लागला. राज्यात खासगी आणि सहकारी अशा सर्व दूध संघांतर्फे रोज तीन कोटी लिटर दूध संकलन होते.  यातील केवळ मुंबई, पुणे, नागपूर या तीन महानगरांतच तब्बल दीड कोटी लिटर दुधाची विक्री होते.

या विक्रीतील ४० टक्के वाटा हा दुग्धजन्य पदार्थ बनवणाऱ्या हॉटेल, मिठाई आदी व्यावसायिकांकडून खरेदी केला जातो. टाळेबंदीनंतर हे सर्व व्यवसाय बंद झाल्याने ही खरेदी बंद झाली आणि विक्रीअभावी दूध मोठय़ा प्रमाणात शिल्लक राहू लागले.

यातून  दूध संघ आणि उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने रोज १० लाख लिटर दूध खरेदी करण्यास सुरुवात केली. दुधाला उठाव नसल्याने अनेक दूध संघांनी दूध भुकटी बनवण्यावर भर दिला. त्यातच पुन्हा शासनाने खरेदी केलेल्या दुधाचीही त्या त्या दूध संघामार्फत भुकटी तयार करण्याचेच काम सुरू झाले.

निम्माही दर नाही

एका बाजूला दूध भुकटीचे उत्पादन वाढत असताना दुसरीकडे त्याची विक्री मात्र पूर्णपणे थंडावली आहे. टाळेबंदीमुळे दूध भुकटीची गरज असणारे बहुसंख्य उद्योग व्यवसाय बंद आहेत. टाळेबंदीपूर्वी २५० रुपये प्रती किलोने विक्री होणाऱ्या या दूध भुकटीला सध्या सव्वाशे रुपये दरही मिळेनासा झाल्याचे ‘गोकुळ’चे कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांनी सांगितले.

राज्यात सर्वात मोठा दूध संघ म्हणून ‘गोकुळ’कडे पाहिले जाते. एरवी १४ लाख लिटर दूध विकणाऱ्या ‘गोकुळ’ची विक्री ११ लाख लिटरवर आली आहे. शिल्लक दुधातील एक लाख लिटरपासून रोज भुकटी बनवली जात आहे. या भुकटीचे साठे रोज वाढत असताना त्याला मागणी मात्र अजिबात नाही. हे चित्र असेच राहिले तर अगोदर दूध विक्रीअभावी अडचणीत आलेले दूध संघ या भुकटीच्या शिल्लक साठय़ांमुळे धोक्यात येण्याची भीती आहे.

– रवींद्र आपटे अध्यक्ष, गोकुळ