ज्येष्ठ नेते गोिवद पानसरे यांच्या खून प्रकरणातील तपास अधिकारी राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अमृत देशमुख यांच्या बदलीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली असल्याची माहिती खासदार राजू शेट्टी यांनी दिली.

शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांची मंत्रालयात भेट घेतली व बदली रद्द करण्याची मागणी केली. त्यास मुख्यमंत्र्यांनी सहमती दर्शविली. दरम्यान,  देशमुख यांच्या जागी शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय साळुंखे यांची बदली झाल्याचा आदेश निघाला आहे.

पानसरे खूनप्रकरणातील तपास अधिकारी असलेले एसआयटीचे प्रमुख संजयकुमार, तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा व अपर पोलिस अधीक्षक एस. चतन्या यांची नियमानुसार बदली झाली आहे. देशमुख हे देखील नियमानुसार बदलीस पात्र असल्याने त्यांची बदली नागपूरला झाली आहे; परंतु त्यामुळे या खुनाच्या तपासावर परिणाम होईल म्हणून त्यांची बदली रद्द करावी, अशी मागणी कोल्हापुरातील सर्वपक्षीय टोल कृती समितीने तसेच पानसरे कुटुंबीयातर्फे डॉ. मेघा पानसरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रभारी विशेष पोलिस महानिरीक्षक प्रकाश मुत्याळ यांच्याकडे पूर्वीच केली आहे.त्याची दखल घेऊन खासदार शेट्टी यांनी याप्रश्नी थेट मुख्यमंत्र्यांचीच भेट घेतली व त्यांना निवेदन सादर केले.

राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अमृत देशमुख यांची चार दिवसांपूर्वी नागपूर येथे बदली झाली आहे. त्यांची बदली रद्द करावी, अशी मागणी विविध संघटनांनी केली आहे. देशमुख हे गोिवद पानसरे यांच्या हत्येतील तपास अधिकारी आहेत.