‘गावाकडे जाऊ द्या, त्यातील अडचणी दूर करा’, अशी मागणी करीत इचलकरंजी शहराबरोबरच परिसरातील ग्रामीण भागात असणाऱ्या शेकडो परप्रांतीय कामगारांनी मंगळवारी पार्वती औद्योगिक वसाहतीसमोर ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. आक्रोश करणाऱ्या या आंदोलकांनी तासभर इचलकरंजी -सांगली मार्ग रोखून धरला.

करोना साथीमुळे टाळेबंदी सुरु असल्याने उद्योग बंद आहेत. गेली दोन महिने काम नसल्यामुळे कामगार हतबल झाले आहेत. वेतन नाही, वाढता खर्च, गावाकडील परिवाराची चिंता या कोंडीत अडकलेले हजारो कामगार गावाकडे जाण्याच्या तयारीत आहेत. इचलकरंजीतील वस्त्रोद्योगाबरोबरच शहरालगत असलेल्या पार्वती औद्योगिक वसाहती, लक्ष्मी औद्योगिक वसाहत या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात परप्रांतीय कामगार आहेत. प्रशासनाकडे अर्ज करूनही जाण्यासाठी परवानगीच मिळत नसल्याने काही युवकांनी सायकलीने उत्तर प्रदेशात जाण्याचा प्रयत्न केला. आठवडाभरात तीनवेळा अशा युवकांना ताब्यात घेऊन पुन्हा परत पाठविण्यात आले. शहरात सुरू केलेल्या केंद्रात तब्बल ७ हजारहून अधिक नागरिकांनी आपल्या प्रांतात जाण्यासाठी अर्ज केले आहेत.

इचलकरंजी लागत असलेल्या शिरोळ तालुक्यातील पार्वती औद्योगिक वसाहत या ठिकाणी मोठय़ा संख्येने परप्रांतीय कामगार आहेत. आज या कामगारांची सहनशीलतेचा कडेलोट झाला. पाचशेहून अधिक परप्रांतीय कामगार एकत्र येऊन आज गजानन महाराज मंदिरसमोर आक्रोश आंदोलन करीत रस्ता रोखून धरला.

याची माहिती मिळताच शहापूरचे पोलीस निरीक्षक प्रकाश निकम यांनी या कामगारांना बाजूच्या मोकळ्या जागेत नेण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांचा आक्रोश अधिकच वाढला. घटनास्थळी आमदार प्रकाश आवाडे,पोलिस उपाधीक्षक गणेश बिरादार, सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव, राजवर्धन निंबाळकर, प्रसाद खोबरे, यांनी कामगारांची समजूत काढली. कामगारांना मूळ गावी पाठविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिल्यानंतर कामगारांनी आंदोलन मागे घेतले.