कोल्हापूर : रेड झोन जिल्ह्यांमधून कोल्हापुरात येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असताना प्रशासनाने प्रत्येक व्यक्तीचा सक्तीने स्वॅब घेऊन संस्थात्मक अलगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. खासगी हॉटेल, आस्थापनामध्ये अलगीकरण करुन त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल केला जाणार आहे.

शासनाने राज्यांतर्गत प्रवास करण्यासाठी सशर्त अनुमती दिली आहे. त्यामुळे कोल्हापुरात येण्यासाठी प्रवाशांच्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. या प्रवाशांवर नियंत्रण ठेवले पाहिजे, अशी मागणी होत आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला.

माझेही ऐकू नका

देसाई म्हणाले,की काही बाबतीत सवलत दिली याचा अर्थ पूर्णपणे शिथिलता दिली असे नाही. गस्त वाढवून टाळेबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा.  मुंबई—पुणे येथून येणाऱ्यांसाठी परवानगी दिली नाही. मुंबई,पुणे येथे जाण्यासाठी पोलीस विभागाकडून पास देण्यात येत आहेत. विना परवाना कुणी जिल्ह्यात प्रवेश करत असेल तर त्याला परत पाठवा. त्याविषयी कुणाचेही ऐकू नका. मी जरी फोन केला तरी त्याला परत पाठवा.

महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले,की शहरात संस्थात्मक अलगीकरण केंद्रांची संख्या वाढवली जात आहे. पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव  देशमुख म्हणाले,की आगामी  ईदच्या निमित्तानेही सतर्क रहा. कोणतेही धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रम होणार नाहीत.

सीपीआरचा गलथान कारभार

जिल्हा प्रशासन सतर्क असल्याचे सांगत असले तरी आरोग्य तपासणी व्यवस्थित न करता प्रवाशांना गावाकडे पाठवले जात असल्याच्या तक्रारी होत आहेत. मुंबईहून तिघे जण रविवारी कोल्हापुरात आले. सीपीआरमध्ये त्यांची तपासणी करून त्यांना भुदरगड तालुक्यातील गावाकडे पाठवून देण्यात आले. त्यांचा करोना अहवाल निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह येतो हे न पाहता गावाकडे पाठवून दिले गेले. या व्यक्ती पॉझिटिव्ह असल्यास त्याचा संसर्ग गावांमध्ये होऊ शकतो. मुंबईमध्ये फक्त संबंधित व्यक्ति फिट कि अनफिट आहे, एवढेच पाहून आरोग्य प्रमाणपत्र दिले जात आहे. अशा गलथान कारभारामुळे कोल्हापुरात करोना वाढून गंभीर परिणाम उद्भवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत सीपीआर रुग्णालयातील सूत्रांनी चौकशी केली जात असल्याचे सांगितले.