हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थी रोहित वेमुलाच्या आत्महत्येचे गुरुवारी कोल्हापुरात तीव्र पडसाद उमटले. नॅशनल एस.सी., एस.टी, ओ.बी.सी स्टुडंट्स अँन्ड युथ फ्रंटमार्फत सरकारच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. तसेच हैदराबाद विद्यापीठाचे कुलगुरू अप्पाराव, केंद्रीय मंत्री आणि कुलपती बंडारु दत्तात्रय व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या सर्वाच्या प्रतीकात्मक पुतळ्याचेही दहनही केले. दरम्यान पोलिस आणि आंदोलकांमध्ये जोरदार झटापटही झाली. तर या प्रश्नी दत्तात्रय बंडारु यांनी राजीनामा द्यावा, दोषींवर कडक कारवाई करावी, रोहित वेमुलाच्या परिवारास पन्नास लाख रुपयांची मदत करावी आणि चार दलित विद्यार्थ्यांचे निलंबनही रद्द करावे अशीही मागणी या संघटनेने केली. तर या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाच वातावरण निर्माण झाले होते.