कोल्हापुरात राज्यभरातून आलेले विद्यावेतनापासूनही वंचित
भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी बनण्याचे स्वप्न घेऊन कोल्हापुरातील प्री आय.ए.एस. ट्रेिनग सेंटरमध्ये आलेल्या राज्यभरातील ८० विद्यार्थ्यांचा सक्षम तांत्रिक सुविधांअभावी दारुण अपेक्षाभंग झाला आहे.
मंदगतीने चालणारे इंटरनेट, बंद पडलेला दूरचित्रवाणीचा संच, अभ्यासू व्याख्यात्यांचा अभाव, अन्य केंद्रावरुन प्रक्षेपित होणाऱ्या व्याख्यानांची दुर्लभता, बंद पडलेले भोजनगृह, साधे ओळखपत्रही न मिळणे, दरमहा दोन हजारांच्या विद्यावेतनास वाटाण्याचा अक्षता अशा असुविधांच्या मालिकेमुळे अभ्यासासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना कोल्हापुरात येऊन फसवणूक झाल्याची जाणीव होऊ लागली आहे. याबाबत केंद्र संचालकांकडे चार महिन्यापासून तक्रार करुनही सुधारणा न झाल्याने आता उरलेल्या चार महिन्यांत बदल होणार का आणि या अल्पकाळात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेसाठी आवश्यक असणारा कठीण अभ्यासक्रम पूर्ण होणार का, याच्या भीतीने विद्यार्थी ग्रासले आहेत.
राज्यशासनाने राज्यात सहा ठिकाणी प्री आय.ए.एस. ट्रेिनग सेंटर सुरु केले आहेत. राजाराम कॉलेज या शासकीय महाविद्यालयाच्या आवारात हे केंद्र सुरु आहे. अलिकडेच येथे भव्य वास्तूच्या जोडीला संगणक, इंटरनेट, सुसज्ज ग्रंथालय, विद्यार्थी व विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, भोजनकक्ष अशा परिपूर्ण सुविधा उपलब्ध केल्या आहेत. मात्र, येथील केंद्रातील तांत्रिक, भौतिक स्वरुपांच्या सुविधांचा बोजवारा उडला असल्याने येथे प्रवेश घेऊन चुकल्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये बळावली आहे.
या केंद्रात प्रवेश मिळण्यासाठी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण व्हावे लागते. फेब्रुवारी ते ऑगस्ट या कालावधीत पूर्व परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंतच्या काळात येथे निवासी स्वरुपात अभ्यास करण्याची संधी मिळते. ही परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेपर्यंत पुन्हा प्रवेश मिळतो. सध्या या केंद्रात ८० विद्यार्थी पूर्व परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी आले असून, या गरसोईमुळे ते त्रस्त झाले आहेत. येथील इंटरनेटची गती इतकी मंद आहे की आवश्यक ती माहिती मिळतच नाही. मोबाइलद्वारा माहिती मिळवायची तर त्याचा खर्च सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या ऐपतीपलीकडचा आहे. पूर्वी अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांचीच व्याख्याने होतात, पण निमंत्रित वरिष्ठांचे एकही व्याख्यान आजवर झालेले नाही. अन्य केंद्रातून मान्यवरांची व्याख्याने प्रक्षेपित स्वरुपात पाहण्याची सोय असली तरी ही यंत्रणा बंद पडली असल्याने त्यालाही मुकावे लागते. दूरचित्रवाणीद्वारा घटना-घडामोडी पहायचे म्हटले तरी तो ही चालू स्थितीत नाही. केंद्र संचालिका सुमित्रा महाराज-पाटील यांच्याकडे तक्रार मांडूनही त्याची दखल न घेतल्याने विद्यार्थ्यांनी ‘लोकसत्ता’कडे आपली कैफियत मांडली आहे. याबाबत सुमित्रा पाटील म्हणाल्या, की इंटरनेटची गती वाढण्यासाठी बीएसएनएलकडे पाठपुरावा सुरु आहे. अन्य तांत्रिक सुविधा विद्यार्थ्यांना मिळाव्यात असा प्रयत्न आहे. भोजनगृह चालविण्यासाठी महिला बचत गट व अन्य कोणी पुढे येत नाही. विद्यावेतन, ओळखपत्र लवकरच देण्याचा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांना ज्येष्ठांच्या व्याख्यानांचे नियोजन करीत आहे.