शासनाचे शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन

राज्य शासन शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सदैव तत्पर आहे. शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झालेल्या गावांची प्रत्यक्षात पाहणी केली असून, शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य शासन भक्कमपणे उभे आहे, अशी ग्वाही सहकार तथा जिल्ह्यचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी शनिवारी  दिली.

सांगली जिल्ह्यतील जत, कवठेमहांकाळ, आटपाडी आणि खानापूर तालुक्यांना भेटी देऊन दुष्काळसदृश्य परिस्थितीची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जतचे आमदार विलासराव जगताप, कवठेमहांकाळच्या आमदार सुमन पाटील, खानापूर आटपाडीचे आमदार अनिल बाबर, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, अपर जिल्हाधिकारी आण्णासाहेब चव्हाण, जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती तमन्नगौडा रवी पाटील आदींसह अधिकारी, शेतकरी उपस्थित होते.

पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी जत तालुक्यातील कुंभारी, कवठेमहांकाळ तालुक्यातील घाट नांद्रे, खानापूर तालुक्यातील हिवरे आणि आटपाडी तालुक्यातील तडवळे या गावांना भेट देऊन दुष्काळसदृश्य परिस्थितीची पाहणी केली. तसेच, शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी शेतकऱ्यांनी अल्प पाऊस पडल्यामुळे म्हैसाळ, टेंभू उपसा सिंचन योजनांच्या पाण्याने तलाव भरून घेण्याची मागणी केली. तसेच, पिण्याच्या पाण्याची कमतरता, जनावरांसाठी पिण्याचे पाणी व चारा छावण्या, भारनियमन, वीज देयके आदींबाबत त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

पावसाअभावी दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झालेल्या गावात आवश्यक उपाययोजना करण्यास राज्य शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले असून, राज्य शासनाच्या सूचनेप्रमाणे दुष्काळसदृश्य परिस्थितीची पाहणी केली आहे. याबाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल मंत्रिमंडळापुढे सादर करणार असल्याचे सांगून पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, या दुष्काळसदृश्य पाहणीत शेतकऱ्यांनी पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची तसेच उपसा सिंचन योजनांच्या पाण्याने तलाव भरून घेण्याची मागणी केली आहे.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र साबळे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडुस्कर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) किरण कुलकर्णी, जतचे उपविभागीय अधिकारी तुषार ठोंबरे, कवठेमहांकाळचे उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात, खानापूर आटपाडीच्या उपविभागीय अधिकारी अश्विनी जिरंगे यांच्यासह संबंधित तालुक्याचे तहसीलदार, गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी, उपअभियंता यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, नागरिक, शेतकरी उपस्थित होते.