ऊस आंदोलन एफआरपीच्या ८० टक्के रक्कम मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेल्या आंदोलनाचा बुधवारी जिल्हय़ात भडका उडाला. ऊस वाहतूक करणारी वाहने रोखने, त्यांची मोडतोड करणे, टायरची हवा सोडणे अशा प्रकारच्या अनेक घटना जिल्हय़ाच्या अनेक गावांत दिवसभरात सुरू होत्या. खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलनाचे नेतृत्व केल्याने संघटनेचे शेकडो कार्यकत्रे आंदोलनात हिरिरीने उतरले होते. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ८० टक्के इतकी एफआरपीची रक्कम मिळावी यासाठी स्वाभिमानी संघटनेने सोमवारपासून आंदोलन सुरू केले आहे. बुधवारी आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी जिल्हय़ात भडका उडाला. हातकणंगले व शिरोळ या दोन तालुक्यांत आंदोलनाची तीव्रता वाढली होती. संघटनेचे शेकडो कार्यकत्रे रस्त्यावर उतरले होते. साखर कारखान्यांनी एफआरपीची रक्कम द्यावी अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक करणारी वाहने रोखून धरली. अनेक गावांमध्ये वाहने अडवून धरल्याने ऊस वाहतुकीवर तसेच गाळपावर परिणाम झाला. या दोन तालुक्यातील कारखान्यांचे गाळप लक्षणीयरीत्या घटल्याचे दिसून आले.
कोरोची येथे ऊस वाहतूक करणाऱ्या पाच गाडय़ांची मोडतोड करण्यात आली. तसेच हातकणंगले येथे दोन गाडय़ांची नासधुस करण्यात आली. कुंभोज, नरंदे या भागातील ऊस वाहतूक दिवसभर ठप्प होती. कुंभोज येथे बावडा कारखान्याची दोन वाहने फोडली गेली.
खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. दुचाकीवर बसून त्यांनी अनेक गावांमध्ये रॅली काढून कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले. त्यांच्या सहभागामुळे कार्यकर्त्यांमध्ये चेव चढला होता. शिरोळ तालुक्यामध्येही अनेक गावांमध्ये ऊस वाहतूक करणारी वाहने रोखून धरण्यात आली होती. कांही गावामध्ये मोडतोडही करण्यात आली.