राजू शेट्टी यांची सुरेश प्रभू यांच्याकडे मागणी

साखरेचे दर दिवसेंदिवस उतरत आहेत. त्यामुळे केंद्राने त्वरित हस्तक्षेप करून ४० लाख टन साखरेचा राखीव साठा (बफर स्टॉक) करून त्वरित साखरेची निर्यात करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी व्यापार आणि वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे मंगळवारी केली.

साखरेच्या उतरलेल्या दरासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यतील शिष्टमंडळाने आज दिल्लीत प्रभू यांची भेट घेतली. यावर प्रभू यांनी साखरेला निर्यात प्रोत्साहनपर अनुदान देण्याबरोबरच अतिरिक्त साखरेची निर्यात करण्यात येईल, असे आश्वासन दिले . साखरेचा बफर स्टॉक करण्यासंदर्भात त्वरित उपाययोजना राबवावी ,  असा आदेश  प्रभू यांनी केंद्रीय वाणिज्य सचिव रिता देवतिया यांना दिला. या वेळी आमदार हसन मुश्रीफ व माजी मंत्री प्रकाश आवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

येत्या महिन्याभरात साखरेचे दर किलोमागे ५ रुपयांनी उतरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना एफआरपी देण्यास साखर कारखानदारांना अडचण निर्माण झालेली आहे.  कोल्हापूर जिल्ह्यतील साखर कारखानदारांनी जयसिंगपूर येथे खासदार शेट्टी यांची भेट घेऊन पडलेल्या साखरेच्या दरासाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा,अशी मागणी केली होती. त्यावर आज शेट्टी यांनी प्रभू यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले.

पाकिस्तानकडून साखर आयात कशासाठी?

शेट्टी म्हणाले, की देशातील साखर उद्योग हेलकावे खात आíथक अरिष्टात  सापडलेला आहे. केंद्राने त्वरित ४० लाख टन साखरेचा राखीव साठा (बफर स्टॉक) केल्यास साखरेच्या दरात चांगली सुधारणा होईल. साखर निर्यातीला अनुदान देण्यात यावे. पाकिस्तानातून २ हजार टन साखरेची आयात करण्यात आलेली आहे. पाकिस्तानसारख्या शत्रू राष्ट्राकडून साखरेची आयात कशासाठी, असा सवाल देखील त्यांनी या वेळी उपस्थित केला. या साखर आयातीची चौकशी करण्याचे आश्वासन प्रभू यांनी दिले.  या संदर्भात लवकरच धोरण जाहीर करण्याची ग्वाहीदेखील प्रभू यांनी दिली. मागच्या सरकारच्या काळात अनुदान देण्यात आले होते, त्याप्रमाणे अनुदान देऊ असेही त्यांनी सांगितले.