केंद्र व राज्य शासनाने साखर उद्योगाच्या हितासाठी कांही चांगले निर्णय घेतले आहेत. या निर्णयाला साखर उद्योगाने प्रतिसाद दिला पाहिजे. साखर निर्यातीचा कोटा पूर्ण करून त्याचे अनुदान मिळविण्याबरोबरच देशातील साखर साठा कमी करून दरवाढ मिळविण्यासाठी साखर उद्योगाने प्रयत्नशील राहावे, असे आवाहन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी रविवारी शिरोळ येथे बोलताना केले.
शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक व माजी दिवंगत आमदार अप्पासाहेब ऊर्फ सा.रे.पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळयाचे अनावरण पवार यांचे हस्ते झाले. कारखाना कार्यस्थळी झालेल्या कार्यक्रमाच्या वेळी साखर उद्योगातील समस्या आणि त्यावरील उपाययोजना याविषयी पवार यांनी विचार मांडले. अध्यक्षस्थानी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील होते. सा.रे. पाटील यांच्या स्मारकाचे भूमिपूजन माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे हस्ते तर सांस्कृतिक भवनचे भूमिपूजन माजी वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांचे हस्ते झाले.
सहकारी चळवळ, साखर कारखानदारी यशस्वी रीत्या चालविण्याची किमया सा.रे. पाटील यांनी करून दाखवली. गेल्या पंचवीस वर्षांत साखर संघाच्या पुरस्कारांची लयलूट त्यांच्या दत्त कारखान्याने केली. मात्र दत्त सारखे यशस्वीपणे चालणारे कारखाने खूपच कमी आहेत, असा उल्लेख करून पवार यांनी साखर उद्योगाने नव्या तंत्राचा अवलंब करण्याची गरज व्यक्त केली. पाण्याचा कमी वापर, उसाची नवीन जात, खताचा योग्य वापर याकडे कारखान्यांनी लक्ष द्यावे. इंडोनेशियामध्ये जपानच्या सहकार्याने नवी जात विकसित केली असून तिला चाळीस दिवसांतून एकदा पाणी द्यावे लागते. कमी कालावधीत पक्व  होणाऱ्या या जातीचा साखर उताराही अधिक आहे. ही जात राज्यातील सर्व अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी साखर संघाचे वतीने व्यापक कार्यक्रम हाती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे वेळी चंद्रकांत पाटील, पतंगराव कदम या आजी-माजी सहकार मंत्र्यामध्ये जुगलबंदी रंगली. कदम म्हणाले, देशातील पन्नास टक्के सहकार चळवळ महाराष्ट्रात आहे. राज्याचा विकास सरकारपेक्षा सहकार क्षेत्राने अधिक केला आहे. सहकारक्षेत्रात दोष जरूर निर्माण झाले आहेत. पण केवळ काँग्रेस-राष्ट्रवादीच्या संस्थावर कारवाई करण्याबरोबरच भाजप-शिवसेनेच्या गरव्यवहार असलेल्या संस्थावरही कारवाई करावी अशी त्यांनी मागणी केली. त्याला उत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले, भ्रष्ट व्यवस्थापन असलेल्या संस्थावर कारवाई करताना पक्ष पाहणार नाही. राज्यातील सर्वप्रकारच्या सहकार क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या २५ संस्थांना राज्य शासन मदत करणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
स्वागताध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी प्रास्ताविकात सा.रे. पाटील यांचे कर्तृत्व, स्वभाव, कार्यक्षमता याचा आढावा घेतला. बाळासाहेब थोरात यांनी विदेशातील तंत्रज्ञान कृष्णाकाठच्या भूमीत यशस्वी रीत्या रुजविण्याचे काम सारे पाटील यांनी केल्याचे सांगितले. दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव अप्पासाहेब पाटील यांनी आभार मानले.