अतिरिक्त साखरेच्या उत्पादनामुळे यंदाचा ऊस हंगाम गाजत असतानाच चालू वर्षीही उसाचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात वाढल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे या वाढीव उसाचे निर्धारित हंगामात गाळप करणे शक्य होणार नसल्याने या वर्षीचा हंगाम एक महिना अगोदरच सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मंत्री समितीने याला मान्यता दिल्यास यंदा ऑक्टोबर महिन्यातच नवा हंगाम सुरू केला जाणार असल्याची माहिती साखर सहसंचालक डी. आय. गायकवाड यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

अतिरिक्त साखर उत्पादनामुळे यंदाचे वर्ष गाजत असतानाच चालू वर्षीही ते वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. उसाच्या मोठय़ा लागवडीमुळे आगामी गाळपाचे नियोजन करण्यासाठी शुक्रवारी कोल्हापुरात सहसाखर संचालकांच्या उपस्थितीत साखर कारखान्यांच्या शेती अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर गायकवाड यांनी वरील हालचालीची माहिती दिली.

यंदा २६ एप्रिलअखेर राज्यात ९४८ लाख टन उसाचे गाळप झालेले आहे, तर एकूण साखर उत्पादन १०६७.३१ लाख क्विंटल एवढे झालेले आहे. यामध्ये आगामी हंगामात अजून वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गायकवाड म्हणाले की, आगामी हंगामातील ऊस उत्पादनातील ही संभाव्य वाढ लक्षात घेता राज्यातील गाळप हंगाम लवकर सुरू करणे गरजेचे आहे. अन्यथा हे एवढे गाळप सरकारने ठरवून दिलेल्या हंगाम काळात करणे शक्यच होणार नाही.