दयानंद लिपारे, लोकसत्ता

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडय़ाच्या काही भागांत झालेल्या अतिवृष्टीने यंदाचा उसाचा गळित हंगाम पुढे ढकलावा लागणार आहे. तर नुकतीच सुरू झालेली गुऱ्हाळेही पुन्हा बंद करावी लागणार आहेत.

या पावसामुळे उसाचे बहुतांश क्षेत्र पाण्याखाली गेले असून त्यामुळे त्याची तोडणी, वाहतूक करणे पुढील काही दिवस अशक्य असल्याने हा निर्णय घ्यावा लागत आहे.

यामुळे अगोदरच संकटातून मार्ग काढत असलेला राज्यातील साखर उद्योग  आणखी अडचणीत आला आहे.

साधारण ऑक्टोबर महिन्यात पावसाने उघडीप दिली, की पश्चिम महाराष्ट्रातील गुऱ्हाळे सुरू होत होतात. तर पाठोपाठ  दसऱ्याच्या सुमारास साखर कारखान्यांची धुराडी पेटतात. यंदा करोना संसर्गाच्या अडचणी असताना चोहोबाजूंनी प्रयत्न केल्याने यंदाच्या हंगामासाठी राज्यातील बहुतांश साखर कारखाने सज्ज झाले. येत्या दसऱ्याच्या मुहूर्तावर अनेकांचे गाळपही सुरू होणार होते.

मात्र चार पाच दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडय़ात पावसाने घातलेल्या धुमाकुळाने उसाअभावी यंदाचा हा हंगाम लांबणीवर पडणार आहे. दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रात चालू झालेली गुऱ्हाळघरेही पुन्हा बंद पडली  आहेत.

झाले काय?

मुसळधार पावसाने उसाचे बहुतांश क्षेत्र पाण्याखाली आहे. शेतात असलेल्या या पाण्याने त्याची तोडणी, वाहतूक करणे पुढील काही दिवस अशक्य आहे. परिणामी साखर कारखाने आणि गुऱ्हाळघरांना पुढील काही दिवस ऊस उपलब्ध होण्यातच मोठी अडचण आहे. शिवाय या ऊसतोडणीसाठी विविध कारखानास्थळावर नुकतेच दाखल झालेल्या ऊसतोडणी कामगारांची निवास व्यवस्था उभी करण्यातही या अतिवृष्टीने अनेक अडथळे तयार केले आहेत. शेतातील हे पाणी सुकल्यावर तसेच ऊसतोडणी कामगारांसाठी निवारा उभा राहिल्यावरच यंदाचा हंगाम सुरू होईल.

अगोदर गेली काही वर्षे साखर उद्योग विविध संकटातून मार्गक्रमण करत असताना चालू वर्षी करोनाने त्यापुढे मोठे संकट उभे केले. त्याने गाळपातील अडचणींपासून ते घटलेली साखर विक्री अशी अनेक संकटे उभी केली. या पार्श्वभूमीवर नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने पुन्हा नवे संकट निर्माण केले आहे.

– प्रकाश आवाडे ,संचालक, साखर कारखाना महासंघ, अध्यक्ष, जवाहर साखर कारखाना