पतसंस्थेकडून घेतलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी सातत्याने होणारा तगादा, त्याचवेळी भिशीचालकांकडून भिशीची रक्कम भरण्यासाठी मागे लागलेला लकडा यामुळे कंटाळून एका वकिलाने आत्महत्या केली. कुर्डूवाडीजवळ भोसरे (ता. माढा) येथे घडलेल्या या घटनेप्रकरणी आठ जणांविरुद्ध कुर्डूवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
साकेत ऊर्फ महाबल महावीर खडके (४२, रा. जिजाऊनगर, भोसरे, ता. माढा) असे आत्महत्या केलेल्या वकिलाचे नाव आहे. त्यांच्या पत्नी प्रिया खडके यांनी यासंदर्भात दिलेल्या फिर्यादीनुसार सुगंध कांतिलाल धर्मराज, पंडित कन्हेरे, विलास साठे, राहुल शेटे, प्रमोद सुर्वे, नीलेश प्रकाश सुराणा, विशाल वाघमोडे व सुवर्णयुग पतसंस्थेचे वसूलदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
अॅड. महाबल खडके यांनी कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर वकिली व्यवसाय सुरू केला होता. परंतु त्यात यश न आल्याने त्यांनी चष्मे विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. कुर्डूवाडीत त्यांचे दुकान आहे. चष्मे विक्रीच्या व्यवसायासाठी खडके यांनी सुवर्णयुग पतसंस्थेकडून कर्ज घेतले होते. तसेच भिशीचीही रक्कम घेतली होती. त्याची थकीत रक्कम वसूल करण्यासाठी भिशीचालक व पतसंस्थेच्या वसूलदाराने सातत्याने तगादा लावला होता. त्यामुळे कंटाळून अॅड. खडके यांनी स्वत:च्या घरात कोणी नसताना छतावरील विद्युत पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.