आगामी निवडणुकीत मनसेला सोबत घेण्याचा विचार केला जाणार नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘हल्लाबोल यात्रे’निमित्त येथे आलेल्या पक्षाच्या नेत्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी तटकरे बोलत होते. गेल्या काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील वाढत्या राजकीय सलोख्याच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादी आणि मनसे एकत्र येणार का, या प्रश्नावर बोलताना तटकरे यांनी वरील स्पष्टीकरण दिले.

आगामी निवडणुकीतील व्यूहनीती स्पष्ट करताना तटकरे म्हणाले, की ही निवडणूक दोन्ही काँग्रेस एकत्रित लढणार असून समविचारी पक्षांना सोबत घेतले जाणार आहे. डावे, समाजवादी,स्वाभिमानी शेतकरी संघटना आदींना सामावून घेतले जाईल. शिवसेना, मनसे यांचा मात्र विचार केला जाणार नाही, असेही यांनी सांगितले.

तटकरे म्हणाले, की लोकांना भुलवणाऱ्या घोषणा देऊन भाजपने सत्ता मिळवली.पण आता जनतेचा दारुण अपेक्षाभंग झाला आहे. यास्थितीत देशातील विरोधी पक्ष एकत्रित येत आहे. समविचारी पक्ष समान भूमिका घेऊन लढणार आहे. त्यामुळे पंतप्रधान कोण, मुख्यमंत्री कोण याला सध्या महत्त्व नाही. आघाडी करताना मुख्यमंत्री कोणाचा अशी भूमिका घेतली जात नाही. ज्या पक्षाला अधिक यश मिळेल त्यावरून सत्तेचे वाटप केले जाईल.

डल्ला सहकारमंत्र्यांनी मारला

डल्ला मारणाऱ्यांनी हल्लाबोल यात्रा काढली आहे, अशी टीका सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केली होती. त्याचा समाचार घेताना धनंजय मुंढे म्हणाले, शेतकऱ्याच्या नावावर परस्पर कर्ज काढणाऱ्या देशमुखांनी शेतकऱ्याच्या खिशावर डल्ला मारला आहे. तूर डाळ खरेदीत यांच्या  मंत्र्यांनी  २२०० कोटींचा डल्ला मारला. यांचे सरकार जाण्याची भीती वाटू लागल्यानेच डल्ला मारणारे सत्ताधारी विरोधकांवर टीका करत असून त्यांना भ्रष्टाचारावर बोलण्याचा अधिकार नाही.