पुण्यातील एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना गुरुवानंद स्वामींची यांनी हवेतून सोनसाखळी काढून देण्याच्या प्रकारावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य अध्यक्ष अविनाश पाटील यांनी येथे टीका केली. फडणवीस यांनी स्वीकारलेल्या या चमत्कारिक माळेला ‘अंनिस’चा आक्षेप असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा करून माफी मागावी अशी मागणी पाटील यांनी केली. अशाप्रकारे स्वामी यांनी चमत्कार सिद्ध केल्यास २१ लाख रुपयाचे बक्षीस देण्याचे त्यांनी जाहीर केले.
राज्यात बुवाबाजी प्रतिबंधक कायदा अमलात आला असताना पुणे येथील सूर्यदत्ता इन्स्टिटय़ूटमध्ये झालेल्या एका कार्यक्रमावेळी गुरुवानंद स्वामी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांच्यासमोरच धूळफेक केल्याचा प्रकार पुढे आला आहे. स्वामींनी हवेत हात फिरवत एक सोनसाखळी काढली आणि ती अमृता फडणवीस यांना दिल्याच्या प्रकारावर अंनिस राज्याध्यक्ष पाटील यांनी येथे पत्रकारांशी बोलताना अक्षेप घेतला आहे.
पाटील म्हणाले, राज्यामध्ये बुवाबाजी प्रतिबंधक कायदा अमलात असून राज्यकत्रे तो राबविणार असल्याचे म्हणत असतात मात्र एखादा स्वामी मुख्यमंत्राच्या पत्नी अमृता फडणवीस यांना चमत्कारिक माळ हवेतून काढून देतो हे पूर्णत आक्षेपार्ह आहे. या प्रश्नी मुख्यमंत्री यांनी खुलासा करून माफी मागितली पाहिजे. याबाबत राज्यकर्त्यांच्या प्रबोधनाचीच गरज असल्याचा टोला लगावला.