मिरजेतील ३ कोटींच्या घबाडाचे रहस्य उकलण्यात पोलीस यशस्वी ठरल्याचा दावा करीत असले तरी अनेक बाबीमध्ये संशयाची स्थिती निर्माण झाली आहे. संशयिताने एका पोलिसाच्या नावाने खरेदी केलेली बुलेट हे संशयाचे कारण असून या प्रकरणी चौकशी झाली, तर सहभागी पोलिसांची नावे स्पष्ट होण्यास मदत मिळणार आहे. मात्र हे प्रकरण चोरीचे असल्याच्या कारणावरून आता तपास कोल्हापूर पोलिसांकडे गेल्याने संशयाचे धुके अधिक गडद झाले आहे.
मिरज-सांगली रस्त्यावरील बेथेलहेमनगरात आढळलेल्या ३ कोटींचे घबाड उघड झाले असले, तरी यामध्ये अनेक बाबी संशयास्पद असून या प्रकरणी काही पोलीस कर्मचारीही सहभागी असल्याचा संशय बळावत चालला आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेला संशयित मोहद्दीन मुल्ला याने तपासाच्या पहिल्या टप्प्यात हा डल्ला कर्नाटकातील चिकोडी येथे मारल्याचे सांगितले होते. मात्र या नोटावर वारणा येथील बँकेचा शिक्का आढळल्याने पाळेमुळे वारणा परिसरात असल्याचा निष्कर्ष काढीत याचे कनेक्शन वारणा येथील प्राध्यापक कॉलनीतील फ्लॅटमध्ये निघाले. बिल्डर झुंजारराव सरनेबत यांची रक्कम असल्याचे स्पष्ट झाले.
मात्र संशयित मुल्लाने या पशातून मिरजेतील एका पोलिसाच्या नावाने बुलेट खरेदी करण्याचे कारण काय? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याशिवाय एका पोलिसाने या मुल्लाकडून ५ लाख रुपये घेऊन फ्लॅटसाठी अनामत जमा केल्याची चर्चा आहे. सध्या बुलेट ज्या पोलिसाच्या नावाने खरेदी केली, त्याची चौकशी का केली जात नाही अथवा असा प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे.
कोटींचे घबाड हे वरवरचे असल्याची चर्चा पोलीस दलात सुरू असून या चोरीच्या रकमेबाबत अनेक संशयास्पद बाबी पुढे येत आहेत. मुल्ला याची झडती घेण्याची पोलिसांना बुद्धी का सुचली याचे समाधानकारक उत्तर यंत्रणेकडून दिले जात नाही. खिशात एक लाख २९ हजार रुपये सापडले यावरून घराची झडती घेतली हे पटत नाही. संशयित मुल्ला स्वत:हून पोलिसांच्या आश्रयाला गेला असल्याचेही सांगण्यात येते. मात्र याबाबत नि:पक्ष चौकशीची गरज असताना कोल्हापूरच्या ताब्यात तपास गेल्याने ज्यांचे हात ओले झाल्याचा संशय आहे, ते कर्मचारी आता सुटकेचा नि:श्वास टाकत आहेत.