शेट्टी-खोत भांडणातून संघटनेत तीव्र मतभेद

जिल्हा परिषद निवडणुकीत एकोप्याने लढून धवल यशाची अपेक्षा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकत्रे करत असताना नेमकी हीच निवडणूक स्वाभिमानीचे सर्वेसर्वा खासदार राजू शेट्टी आणि त्यांचे जिव्हाळय़ाचे मित्र, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यातील अंतर वाढवण्यास कारणीभूत ठरली आहे. घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित करत शेट्टी यांनी खोत यांच्या पुत्राच्या उमेदवारीवर निशाणा साधला, पण शेट्टी यांची हीच भूमिका पुत्र पराभवास कारणीभूत ठरल्याचा आक्षेप घेत खोत यांनी शेट्टींवर पलटवार केला आहे. निवडणुकीतील घटनांचा सारा प्रवास पाहता दोन्ही मित्रांचे मत्रीचे हात दुरावत चालल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. याची परिणती स्वाभिमानी शेतकरी संघटनेत दुभंग निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

देशभरात मोदी लाट सुरू झाल्यावर शेट्टी हे भाजपशी हातमिळवणी करते झाले. केंद्रात व राज्यात सत्ता आल्यावर ‘स्वाभिमानी’ सत्तासंगत करू लागली. त्यातून खोत यांच्या रूपाने स्वाभिमानीकडे लाल दिवा आला. नव्याचे नऊ दिवस सरले आणि स्वाभिमानासाठी लाल दिवा धोक्याचा ठरू लागला. शेट्टी-खोत यांच्यातील अंतर वाढू लागल्याची चर्चा आणि चिंताही स्वाभिमानीच्या गोटात सुरू झाली.

पुत्रप्रेमाचा अडसर

दोघा मित्रांतील या वादाला उघडपणे तोंड फुटले ते जिल्हा परिषद निवडणुकीत. घराणेशाहीला विरोध हे शेट्टी यांच्या राजकारणाचे तत्त्व. त्याला छेद देत सदाभाऊ खोत यांनी बागणी जिल्हा परिषद निवडणुकीत पुत्र सागर याला उभे केले. त्याला मुलामा दिला तो ही उमेदवारी लोकाग्रहास्तव असल्याचा. या मुलाम्याचे काय झाले ते निकालाने दाखवून दिले. पुत्र उमेदवारीस शेट्टी यांनी टोकाचा विरोध केला. तिकडे प्रचाराला जाण्याचे त्यांनी टाळले. यातून स्वाभिमानीच्या कार्यकत्रे-मतदारांना जायचा तो संदेश गेला होताच.

प्रचारादरम्यानच्या काही घटना मत्रीत बाधा आणणाऱ्या घडल्या. मुख्यमंत्र्यांच्या सभेला हजेरी लावण्याबरोबरच भाजपचे उपरणे खोत यांनी गळय़ात घातले. सत्तेतील सहकारी म्हणून मंचावर जाणे अनुचित कसे, असा सवाल खोत यांनी केला तरी भाजपपासून फटकून राहणाऱ्या शेट्टी यांना हा खुलासा मानवणारा नव्हता. पाठोपाठ शेट्टी यांचे कट्टर विरोधक माजी मंत्री विनय कोरे यांच्या भेटीला खोत पोहोचल्याने शेट्टी यांचा तिळपापड होणे स्वाभाविक होते. खेरीज, शेट्टी हे बागणीत प्रचाराला जाऊ शकले नाहीत आणि खोत यांनी मंत्री असतानाही राज्यभर प्रचाराला जाण्याचे टाळले. यामुळेही मतभेदाची दरी रुंदावत चालली.

इतक्याने वाद संपला नाही. पुत्र पराभवाने व्यथित झालेल्या खोतांनी शेट्टींवर टीकास्त्र सोडले.  ‘तत्त्वाचे राजकारण आयुष्यभर करण्यासाठी शेट्टींना शुभेच्छा!’ अशा शब्दांत सदाभाऊंनी शेट्टींना टोला लगावला. त्यांच्या टीकेमुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेत वाद चांगलाच चव्हाटय़ावर आला आहे. खोत यांच्या या वक्तव्यावर राजू शेट्टी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले, की सदाभाऊ बागणीत अडकल्याने मलाच राज्यभर प्रचार दौरा करणे भाग पडल्याने मला बागणीला जाणे जमले नाही. सध्या ते वेगवेगळी विधाने करीत आहेत. या बाबत मार्च महिन्यात राज्य कार्यकारिणीच्या बठकीत ‘योग्य निर्णय’ घेतला जाईल. शेट्टी हे मार्चमध्ये योग्य निर्णयाची भाषा करत असले तरी वाळवा तालुक्यातील राजकारणावरून निर्माण झालेली मतभेदाची दरी शेट्टी-खोत यांच्या मत्रीला वाळवी लागण्यापर्यंत टोकाला जाण्याची शक्यता दिसत आहे.