News Flash

कांद्याच्या घसरगुंडीवरून सरकारला घरचा आहेर

‘स्वाभिमानी’च्या मुखपत्रात टीका

स्वाभिमानीच्या मुखपत्रात टीका

कांद्याच्या कोसळलेल्या दरावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केंद्र शासनाच्या धरसोड वृतीवर टीका करीत कांद्याला अवघे पाच पसे दर मिळण्याची सरकारला लाज वाटली पाहिजे, अशा शब्दात घरचा आहेर दिला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनच्या मुखपत्र असलेल्या ‘स्वाभिमानी विचार’ या पाक्षिकामध्ये कांद्याच्या दराला केंद्र शासनाला जबाबदार धरले आहे.

अलीकडे कांद्याचे बाजारातील घसरलेले दर शेतकऱ्याचे काळजी वाढवणारे ठरले आहेत.  मातीमोल किंमतीला कांदा विकला जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मोठय़ा कष्टाने कांद्याचे उत्पादन  घेतले पण उत्पादन खर्च निघणे राहिले दूर, उलट अत्यल्प किंमतीला कांदा विकण्यावाचून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पर्याय राहिला नाही. त्याच्या तीव्र प्रतिक्रिया बळीराजातून उमटल्या, त्या शेतकरी संघटनेच्या नेत्यांच्या कानावरही गेल्या. शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे कृषी व पणन राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी राज्यशासन नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी करणार असल्याचे सांगून दिलासा दिला. कांदा उत्पादक शेतकऱ्याना अनुदान देण्याचा तसेच इतर राज्यांतील व्यापाऱ्यांना कांदा खरेदीचे परवाने देण्याचा इरादाही व्यक्त केला.

स्वाभिमानी शेतकरी संघटना मंत्र्यांनी आश्वस्त केल्यानंतरही थांबली नाही. संघटनेच्या नेतृत्वाला थेट शासनावर टीका करणे त्रासदायक ठरणार असल्याची शक्यता असल्याने मुखपत्राचा आधार घेत केंद्र शासनावर निशाणा साधला आहे . त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला साजेशा अशा खरमरीत शब्दांचा आधार घेतला आहे. कांद्याला केवळ पाच पसे दर मिळालेला पाहून शेतकरी रडकुंडीस आला आहे.

सध्या चलनात पन्नास पशाचे नाणे वापरात नसताना फक्त पाच पसे कांद्याला दर मिळणे ही शोकांतिका आहे. केंद्राच्या धरसोड वृतीमुळे शेतकऱ्यांना हे सोसावे लागत आहे. मोदी सरकारच्या या धोरणामुळे शेतकरी भिकेकंगाल झाला आहे.

कांद्याला पाच पसे दर मिळणे म्हणजे या सरकारला लाज वाटली पाहिजे, अशा शब्दात सरकारवर कोरडे ओढण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याची मानसिकता सरकारची दिसत नाही. कांद्याच्या पडत्या दरामुळे शेतकरी भिकेकंगाल होऊन आत्महत्या करू लागला आहे.

सरकार कोणत्याच उपाय योजना करत नाही. स्वामिनाथन अहवाल स्वीकारण्याचे आश्वासन मोदी सरकाराने दिले होते, मात्र आता त्यांनी स्पष्ट नकार दिल्याने त्यांची ‘फेकोगिरी’ पुन्हा समोर आलेली आहे, असा प्रहारही स्वाभिमानीकडून सरकारला आडपडद्याने लगावला गेला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2016 2:22 am

Web Title: swabhimani shetkari sanghatana comment on government over onion issue
Next Stories
1 कोल्हापुरात घरगुती गणेशाला निरोप
2 स्वागत कमान लावण्यावरून दोन मंडळांमध्ये वाद, दगडफेक
3 ‘पीओपी’च्या विरघळण्यावर कोल्हापुरात प्रयोग
Just Now!
X