अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्यावतीने २५ सप्टेंबर रोजी पुकारलेल्या भारत बंदमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना सहभागी होणार आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी बुधवारी येथे दिली.

मोदी सरकारने संसदेत मांडलेल्या तीन शेतकरी विधेयकांना मंजुरी मिळाली आहे. मात्र, या विधेयकांना मंजुरी मिळाल्याने याचे तीव्र पडसाद सध्या देशभरात उमटत आहेत. देशातील शेतकऱ्यांची संघटना असलेल्या अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने या विधेयकांचा तीव्र विरोध केला असून यांमधून शेतकऱ्यांना कोणताच लाभ होणार नसल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, सरकार हमीभावातून शेतकऱ्यांना बाजूला सारत आहे. या शेतकरी धोरणाविरोधात देशभरातील शेतकरी संघटनानी या विधेयकाच्या विरोधात २५ सप्टेंबर रोजी भारत बंद पुकारला आहे. या बंदला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा असून राज्यातील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारने शेतकरी कायदा मंजूर केल्याच्या विरोधात कडकडीत बंद पाळावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.