मासे मृत्युमुखी पडण्याची वारंवार घटना

कोल्हापूर : शिरोळ तालुक्यात पंचगंगा नदीत दूषित पाण्यामुळे वारंवार मासे मृत्युमुखी पडण्याचे प्रकार वाढत चालल्याने बुधवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी थेट बंधाऱ्यातील नदीपात्रात उतरून आंदोलन केले. संबंधित घटकांवर कारवाई न केल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निष्क्रियतेवर त्यांनी टीकेची झोड  उठवली.

पंचगंगा नदीच्या तेरवाड बंधाऱ्यामध्ये दूषित पाण्यामुळे मासे मृत्युमुखी पडण्याचा प्रकार वारंवार घडत आहे. दीड महिन्यापूर्वी असाच प्रकार घडल्यानंतर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांंनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्याला दोरखंडाने बांधून ठेवले होते. त्यावर कार्यकर्त्यांंवर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीत संबंधित घटकांवर कारवाई करावी, उद्योगांना टाळे ठोकावे असा आदेश दिला होता.

मात्र पुन्हा एकदा पंचगंगा नदीमध्ये दूषित पाण्यामुळे मासे मृत्युमुखी पडत असल्याचे निदर्शनास आले आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांंनी पात्रात उतरून निदर्शने केली.

शासनाने बंधाऱ्यावर येऊन बैठक घ्यावी अशी मागणी केली. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी बंधाऱ्यावर येत नाही तोपर्यंत नदीतून बाहेर न येण्याचा पवित्रा त्यांनी घेतला. घटनास्थळी शासनाचा कोणीही अधिकारी दाखल न झाल्याने कार्यकर्त्यांंमध्ये संतापाची लाट पसरली. संबंधित घटकांवर आणि कारवाई दुर्लक्ष करणाऱ्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी घोषणाबाजी त्यांनी केली.