दयानंद लिपारे, लोकसत्ता

कोल्हापूर : एकीकडे अनुभवी मंत्र्यांचा संच आणि दुसरीकडे राज्याचे महसूल मंत्री पद सांभाळलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांच्यातील वर्चस्वाची लढाई म्हणून पाहिल्या गेलेल्या शिक्षक मतदारसंघांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसच्या उमेदवाराने बाजी मारली. यामुळे कोल्हापुरात आघाडीला ‘महा’बळ प्राप्त झाले आहे, पुणे सह सर्व ठिकाणी भाजपाचा विजय होईल, असा ठाम विश्वास व्यक्त करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांच्यासमोरील चिंता आणखी वाढीस लागली आहे.

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक एकाचवेळी असल्याने येथून सलग दोनदा चंद्रकांत पाटील यांनी विजय मिळवला असल्याने भाजपची कसोटी होती. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी पदवीधरमध्ये संग्राम देशमुख यांना निवडून आणण्यासाठी त्यांनी जशी तयारी केली होती, तसेच भाजप पुरस्कृत जितेंद्र पवार यांच्या विजयासाठीही त्यांनी व्यूहरचना केली होती.परिणामी चंद्रकांतदादांनी निर्माण केलेले आव्हान पेलताना कोल्हापूर जिल्ह्यातील आघाडीच्या नेत्यांची कसोटी लागली होती. जिल्ह्यातील तिन्ही मंत्री, खासदार, आमदार यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. तिन्ही मंत्र्यांच्या एकसंधतेमुळे विजय सुकर झाला.

चंद्रकांतदादांसमोर आव्हान

या निवडणुकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासमोरही मोठे आव्हान होते. एका बाजूला जिल्ह्यातील तिन्ही पक्षाचे तीन मंत्री, खासदार —आमदार आणि एकही लोकप्रतिनिधी नसलेला भाजप अशा विषम स्थितीत जिल्ह्यात अधिकाधिक मते मिळवणे हे सोपे नव्हते. तरीही प्रचंड आशावादी असलेले आमदार पाटील पुणेमधील दोन्ही जागांसह सर्व सहा जागा जिंकू, असे सांगत होते. प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्यातच भाजपच्या दोन्ही उमेदवारांना मते कमी मिळाली असल्याने त्यांना या निकालाने अधोन्मुख व्हावे लागले आहे.  यामुळे आगामी महापलिका, सहकारी संस्था येथे कमळ फुलवणे आव्हानास्पद असणार आहे. या निवडणुकीत भाजपमध्ये आलेल्या आयारामांनी फारशा हालचाली केल्या नसल्याचा फटकाही उमेदवारांना बसला असल्याने त्यांच्याबाबतीत आमदार पाटील हे कोणते धोरण घेणार यावरही भाजपची जिल्ह्यातील राजकीय वाटचाल अवलंबून असणार आहे.

सतेज पाटील तरले

‘शिक्षक’ मतदारसंघामध्ये पालकमंत्री सतेज पाटील यांची  ‘परीक्षा’च होती. महिनाभर आधी काँग्रेसच्या आंदोलनावेळी राज्याचे प्रभारी एच. के.  पाटील व प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासमोर पाटील यांनी दोन्हीपैकी एक मतदारसंघ काँग्रेसला द्यावा; तेथे उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी माझी व काँग्रेस पक्षाची राहील, अशी मागणी केली होती. जयंत आसगावकर यांच्या रूपाने उमेदवारी दिल्यावर त्यांना निवडून आणण्यासाठी मंत्री पाटील यांनी अतिशय सूक्ष्म नियोजन केले. राष्ट्रवादीचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, शिवसेनेचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेंद्र पाटील—यड्रावकर,कॉंग्रेस — शिवसेनेचे खासदार ,आमदार या सर्वांना प्रचार यंत्रणेत गुंफले. या सांघिकतेमुळे मतदारांमध्ये जायचा तो संदेश गेला. तिन्ही पक्ष एकत्रित असल्याने मते एकवटली. मतविभागणीचा फायदा भाजपला मिळाला नाही. विधान परिषद निवडणुकीत पराभूत झाल्यापासून सतेज पाटील हे अधिक सतर्क बनले आहेत. विधानसभा निवडणुकीत त्यांनी जिल्हा अध्यक्ष या नात्याने जिल्ह्यात चार आमदार निवडून आणले होते,. तर आता आसगावकर यांच्या रूपाने आणखी एक आमदार निवडून आल्याने त्यांची ताकद वाढली असून आगामी महापालिका निवडणुकीला आणि विधानपरिषद निवडणुकीला फायदा होऊ शकतो.