नवीन वर्षांच्या दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमाची खुमारी अनुभवण्यासाठी म्हणून नेहमीच्या सवयीने टीव्ही ऑन केला, पण हाय रे देवा, कार्यक्रम दिसणे दूर; उलट प्रथमच टीव्हीचा पडदा अस्पष्ट दिसू लागल्याने निराशाच अनुभवावी लागली. असा प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो कुटुंबात नववर्षांच्या पहिल्याच दिवशी आला. टीव्हीसाठी सेटटॉप बॉक्स बसविण्याची मुदत ३१ डिसेंबर रोजी संपल्याने हा कटू प्रसंग अनेक कुटुंबाच्या वाटय़ाला आला.
केबलच्या माध्यमातून होणाऱ्या टीव्ही प्रक्षेपणामध्ये मोठय़ा प्रमाणात घोटाळा होत असल्याची माहिती शासकीय यंत्रणेस सर्वेक्षणानंतर उपलब्ध झाली आहे. केबल चालकांचे खिसे भरले जात असताना शासनाच्या करमणूक विभागाची तिजोरी मात्र रिकामीच रहात होती. याला चाप लावण्यासाठी सेटर्टाप बॉक्स अनिवार्य करण्याचा निर्णय करमणूक विभागाने घेतला असून त्यासाठी ३१ डिसेंबर ही अखेरची मुदत होती. या तारखेपर्यंत जिल्ह्यात अवघ्या ७५ हजार टीव्ही संचांना सेटटॉप बॉक्स बसविण्यात आले आहेत. यामध्ये सर्वाधिक कोल्हापूर शहरात ३० हजार तर इचलकरंजीत १२ हजार संख्या आहे. पहिल्या टप्प्यात शहर व तालुक्यांच्या गावामध्ये सेटटॉप बॉक्स बसविले जाणार आहेत. यासाठी कुटुंबांची संख्या व त्यामध्ये असणाऱ्या टीव्ही संचांची संख्या पाहता ७५ हजार सेटटॉप बॉक्सची संख्या खूपच कमी आहे. यामुळे सेटटॉप बॉक्स नसल्याने किती आíथक घोळ होत होता हे स्पष्ट होऊ लागले आहे.
सेटटॉप बॉक्सच्या मागणीत वाढ
टीव्हीवरील कार्यक्रम पाहता न येऊ लागल्याने जाग्या झालेल्या ग्राहकांनी सेटटॉप बॉक्स मिळवण्यासाठी घाई सुरु केली आहे. डिजीटल संच २५०० रुपये तर साधा संच १५०० रुपयात मिळत आहे. संच संपले असल्याने ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. परिणामी दोन-तीन दिवस टीव्हीवरील कार्यक्रमांना प्रेक्षकांना मुकावे लागणार आहे.