कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात करोना संसर्गाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढून चिंता निर्माण झाली असताना त्यावर मात करणाऱ्यांची संख्या आता दहा हजारावर पोहोचली आहे. हे दिलासादायक चित्र आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात गेले ३ आठवडे करोनाचे रुग्ण झपाटय़ाने वाढत आहेत. सरासरी पाचशे रुग्ण शहर आणि ग्रामीण भागात आढळून येत आहे. करोनाचा  सामाजिक संसर्ग निवारण करताना शासन, आरोग्य विभाग, प्रशासनाची धावपळ उडाली आहे. आज करोना चाचणीचे दीड हजार प्राप्त अहवालापैकी १  हजार २४८ नकारात्मक होते तर ३२९ अहवाल सकारात्मक आहेत.

जिल्ह्यात आजअखेर एकूण १८ हजार सकारात्मक पैकी १० हजाराहून अधिक जणांना उपचार करून घरी पाठवण्यात आले आहे. करोनावर मात  करणारे रुग्ण वाढत आहेत. हे दिलासादायक चित्र आहे. सध्या जिल्ह्यात ८ हजार सकारात्मक रुग्ण असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत, अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.