करोना संसर्गनिवारणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अपयशी ठरले आहेत. त्यांनी एक नव्हे दुहेरी पीपीई किट घालून संकटाशी मुकाबला करण्यासाठी बाहेर पडले पाहिजे. गेली दोन महिने त्यांनी स्वतःला ‘मातोश्री’मध्ये क्वारंटाइन करून घेतले आहे, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी येथे केली. दीर्घकाळ कोल्हापूर जिल्ह्यात आले नसल्याने टीका करणारे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरही चंद्रकांत पाटील यांनी टीका केली.

कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खरपूस टीका केली. राज्यातील करोना संकट निवरणामध्ये ठाकरे सरकार अपयशी ठरले आहे, असा टोला त्यांनी लगावला. अशा संकटसमयी ठाकरे यांनी पाय रोवून उभे राहून लोकांना धीर द्यायला हवा होता. मात्र, त्यांनी बचावात्मक भूमिका घेतली आहे. लोकांना वाचवणे महत्वाचे आहे. पण त्यांनी स्वतःला होम क्वारंटाइन केले आहे. खरे तर अशा परिस्थितीत दिवसातून अनेकदा पीपीई किट बदलले तरी चालतील, पण बाहेर पडा. राजा सर्वत्र फिरतो तेव्हाच प्रजा ठिकाणावर असते. मात्र, या सरकारकडून असे काहीच होताना दिसत नाही, अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली. करोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी २२ मे रोजी भाजपा राज्यभर आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

“चंद्रकांत पाटील हे कोल्हापुरातील नागरिक मेले की जिवंत आहेत हे पाहायला सुद्धा आले नाहीत,” अशी बोचरी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली होती. याला प्रत्युत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “मुश्रीफ यांनी हा प्रश्न सर्वात आधी त्यांच्या नेत्यांना विचारायला हवा. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांनी मातोश्री सोडलेलं नाही. मुश्रीफ ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्या जिल्ह्यात ते याक्षणी असायला हवे होते. संकट निवारण करण्याऐवजी आपण इथे काय करता? असा टोलाही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी लगावला.