कोल्हापूर : राज्य शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नववर्षदिनी, १ जानेवारी रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. याअंतर्गत ते कोल्हापूर जिल्ह्यातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या इच्छुक लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत, असे मंगळवारी प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. यापूर्वी असा संवाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला होता.

केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची राज्यात अंमलबजावणी सुरू आहे. प्रधानमंत्री आवास योजना (नागरी व ग्रामीण), उन्नत शेती-समृद्ध शेतकरी योजना, शेतकरी सन्मान योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, शेततळे, गाळमुक्त धरण आदी योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री फडणवीस यांनी विविध जिल्ह्यंमध्ये आणि मंत्रालयातही या योजनांचा आढावा घेतला आहे. आता या विविध योजनेतील लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री थेट संवाद साधणार असून १ जानेवारी रोजी प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांशी ‘लोकसंवाद’ कार्यक्रमाद्वारे याचा शुभारंभ होणार आहे.

मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद साधण्याची इच्छा असणाऱ्या इच्छुक लाभार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नाव, संपर्क क्रमांक-पत्ता आणि योजनेचा लाभ घेतल्याची माहिती जिल्हा माहिती अधिकारी, नवीन मध्यवर्ती इमारत येथे २६ डिसेंबरपर्यंत पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.