गेल्या आठवडयात ‘दि लिजंड ऑफ पद्मावती’ चित्रपटाचा सेट पेटवून दिल्याचा खळबळजनक प्रकार घडून लाखोचे नुकसान झाले असले तरी त्यामुळे डगमगून न जाता पुन्हा त्याच मसाई पठारावर या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले आहे. या वेळी पन्हाळ्यासह या परिसरात सुरक्षेची काटेकोर काळजी घेण्यात आली आहे.

पन्हाळ्या लगतच्या मसाई पठारावर दिग्दर्शक, निर्माता संजय लीला भन्साळी यांची  निर्मिती असलेल्या  ‘द लिजंड ऑफ पद्मावती’ या  बहुचíचत  चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना गेल्या बुधवारी मध्यरात्री सेट जाळण्यात आला. सुमारे ५० जणांच्या अज्ञात गटाने सेट पेटवून दिल्याने आगीत कोणालाही दुखापत झाली नसली तरी तेथे बांधण्यात आलेल्या काही घोड्यांना आगीची झळ बसून ते जखमी झाले. या चित्रपटावेळी वाद होण्याचा हा दुसरा प्रकार होता .

मोठे नुकसान झाले असले तरी येथे करावयाचे उर्वरित शूटिंग पूर्ण करणे गरजेचे होते, त्यामुळे आता येथे आणखी ४ दिवस चित्रीकरण चालणार असल्याचे लाईन प्रोड्युसर मििलद अष्टेकर यांनी गुरुवारी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले .

कोट्यवधीचा चित्रीकरण सेट नव्याने उभा करून कडक सुरक्षा व्यवस्थेत शूटिंग धूमधडाक्यात चालू करण्यात आले आहे. रथ व डोली आणि युद्धातील प्रसंग पाचशे कलाकार सेट उभारणी कामात मग्न असून हत्ती, घोडे आणि उंट लवाजमा दाखल झाला आहे. दुसरीकडे चित्रीकरणाचे काम जोरदार चालू आहे.

भक्तगण अडचणीत

चित्रीकरण सेटकडे पत्रकार आणि छायाचित्रकार तसेच प्रेक्षकांना मज्जाव करण्यात आला आहे. मसाईदेवीला जाणाऱ्या भक्तांना बंदी घालण्यात आली असून ही बंदी कशासाठी, असा जनतेतून सवाल केला जात आहे. यापूर्वी या चित्रपटाचे चित्रीकरण राजस्थान, जयपूर येथे सुरू असताना तेथे विरोध झाला होता.

तपास थंड

सेटचीही तोडफोड करून चित्रीकरण बंद करावे लागले होते. ऐतिहासिक पन्हाळ्याच्या शांततेला या घटनेने गालबोट लागले . पण, या घटनेचा पोलीस तपास आठवड्यानंतरही थंड आहे . पोलिसांना कोणतेही सूत्रे वा आरोपी हाती लागले नाहीत . तपासाचे अपयश झाकण्यासाठी आता अनेक अटी मात्र लादल्या आहेत.

सशस्त्र बंदोबस्त

ताजा कटू अनुभव लक्षात घेऊन चित्रीकरण मोठया बंदोबस्तात पार पडत आहे .  त्यासाठी ३० सशस्त्र पोलीस , स्वतंत्र सुरक्षा रक्षक , प्रखर प्रकाशासाठी उंच टॉवर अशी वेगवेगळी उपाययोजना केली आहे . नव्याने काही गोंधळ  होणार नाही , याची दक्षता घेतली गेली आहे.