करोना संकटाचा सामना करण्यासाठी मोदी सरकारने सर्व घटकांना मदत देताना व्यवहार्यता लक्षात घेतली आहे. परंतू, राहुल गांधी हे मात्र प्रत्येक नागरिकाला साडेसात हजार रुपये देण्याची मागणी करीत आहे. ही मागणी योग्य वाटत असेल तर त्यांच्या महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने ही रक्कम जनतेला द्यावी, असा पलटवार भाजपाचे प्रदेश सरचिटणीस सुरेश हाळवणकर यांनी मंगळवारी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलताना केला.

मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील पहिल्या वर्षातील विकास कामांची माहिती देण्यासाठी कोल्हापुरात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी हाळवणकर यांनी राहुल गांधी यांना टीकेचे लक्ष केले. ते म्हणाले, “राहुल गांधी यांनी सामान्य जनतेला साडेसात हजार रुपये द्यावे अशी मागणी केली असून त्यांच्या राज्यातील शासनाने या मागणीची पूर्तता करावी. मोदी सरकारने जाहीर केलेल्या २० लाख कोटी पॅकेजच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष दहा हजार रुपयांचा लाभ होणार आहे, असा दावाही त्यांनी यावेळी केला.”

दरम्यान, राज्य शासनाकडून धान्य वितरणात गडबड होण्याची भीती व्यक्त करताना हाळवणकर म्हणाले, “देशातील ८० कोटी जनतेला पाच महिने २५ किलो तांदूळ व गहू तसेच पाच किलो डाळ मोफत दिली जाणार आहे. राज्यातही हे धान्य मिळणार आहे. परंतू, रेशन दुकानदार निर्ढावलेले असल्याने ते काहीतरी गडबड करण्याची शक्यता आहे. राज्य शासनात कोणाला कोणाचा पायपोस नसल्याने अन्नधान्य वितरण व्यवस्थेत गोंधळ होण्याची भीती आहे. त्यामुळे भाजपाचे कार्यकर्ते धान्य वितरण व्यवस्थेवर लक्ष ठेवणार आहेत. अन्नसुरक्षा कायद्यानुसार धान्य वाटप करण्यात यावे, असे फलक हाती घेऊन भाजपा कार्यकर्ते रेशन दुकान समोर उभे राहणार आहेत.”

अडचणीत आलेल्या उद्योजकांसाठी मोदी सरकारने मोठी मदत केली आहे. राज्यासाठी तीन हजार कोटी रुपये या योजनेतील बँकांनी मंजूर केले आहेत. त्यासाठी वर्षभर व्याज आकारणी केली जाणार नाही. मात्र, हे करीत असताना सर्व काही मोफत मिळावे ही अपेक्षा ठेवणे गैर आहे. वीज, पाणी, कर्ज असे सर्व काही फुकट देण्यातून आपण आत्मनिर्भर होणार नाही, याचीही जाणीव ठेवणे गरजेचे आहे, असे हाळवणकर यावेळी म्हणाले.