जयसिंगपूर येथे नगरीच्या शतकमहोत्सवानिमित्त जगातील सर्वात मोठय़ा आकाराच्या पुस्तकाची निर्मिती केली आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून जयसिंगपूरचा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचविण्याचे केलेले ब्रम्हाकुमारी विश्वविद्यालयाच्या सेवा केंदाचे ऐतिहासिक कार्य गौरवास्पद आहे, असे उद्गार खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी काढले. २० फूट उंची व ३० फूट रुंदी अशा विशाल आकारात असलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते .

जयसिंगपूर येथील ब्रम्हाकुमारी विश्वविद्यालय सेवा केंद्राच्या द्विदशक महोत्सव व शहर शताब्दी वर्षांनिमित्त राजर्षी शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या जयसिंगपूर शहराचे ऐतिहासिक कार्य या पुस्तकाद्वारे प्रकाशित करण्यात आले आहे. पुस्तकातील संदेश सात कोटी लोकांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प केलेले डॉ. दीपक हारके यांचा सत्कार करण्यात आला.

आमदार उल्हास पाटील, नगराध्यक्षा डॉ. नीता माने, माजी नगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, चकोते उद्योगसमूहाचे अध्यक्ष  अण्णासाहेब चकोते यांनी ब्रम्हाकुमारी विश्व विद्यालयाच्या वतीने डॉ. स्वर्णश्री गुर्रम, गंगाधरभाई, सुनीता बेहनजी यांनी मनोगत व्यक्त केले .

स्वागत राणी बेहनजी यांनी केले. प्रास्ताविक उत्तमभाई यांनी केले. प्राजक्ता नवाळे हिने भरतनाटय़ सादर केले. गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष माधवराव घाटगे, नगरसेविका स्वरूपा पाटील-यड्रावकर, बजरंग खामकर उपस्थित होते.